नुकसान भरपाईसाठी पेण तहसील कार्यालयावर पूरग्रस्तांची धडक

305

पेण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात बोरी विभागातील हजारो ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पुरग्रस्थांनी बोरी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिभा म्हात्रे व शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पेण तहसीलदार कार्यालयावर धडक देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. या प्रसंगी उपसरपंच दत्ता म्हात्रे, शोभा म्हात्रे, तंटामुक्त अध्यक्ष जगदीश म्हात्रे, संतोष म्हात्रे, अंकुश कोठावले, कल्पेश गावंड, मंगेश म्हात्रे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ हजर होते.

पेण तालुक्यात 3 व 4 ऑगस्ट रोजी झालेल्या महापुरामुळे बोरी येथील खाडीचा पूर्व व पश्चिम दिशेचा बांध फुटून बोरी, बेणेघाट, शिंगणवट, जुनी बोरी, शिंगणवटबेडी येथील गावांमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यातच शहापाडा धरणाचे पाणी व अतिवृष्टीचे पाणी गावातील घराघरांत व शेतात व शेततलावात शिरून आलेल्या महापुरामध्ये ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पुरामध्ये बोरी वडखळ रस्तासुद्धा वाहून गेला आहे. या पूरग्रस्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत. परंतु आजतागायत कोणतीही मदत न मिळाल्याने तसेच सणवार गणेशोत्सव जवळ आली नाही.

त्यामुळे पूरग्रस्त ग्रामस्थांनी शासकीय मदत लवकरात लवकर मिळण्याकरता बोरी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिभा म्हात्रे व शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पेण तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. यावेळी शासनाच्या माध्यमातून नियमानुसार पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही तहसीलदार डॉ. अरूणा जाधव यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या