येडियुरप्पा यांचे अजब आवाहन, 10 कोटी द्या, पूरग्रस्त गावाला स्वतःचे नाव द्या!

572

कर्नाटकमधील भीषण पुरामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली. या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी देशातील बडय़ा उद्योजकांना आवाहन केले आहे. 10 कोटी रुपये द्या आणि पूरग्रस्त गावाला स्वतःचे नाव द्या, असे अजब आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

भीषण पुराला सामोरे जाण्यासाठी येडियुरप्पा यांनी निधी जमवण्यासाठीच हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे कर्नाटकात आता ‘अंबानी’, ‘टाटा’, ‘अदानी’ अशी गावांची नावे होणार का अशी चर्चा सोशल माध्यमांवर रंगू लागली आहे. या अजब फंडय़ातून मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत 4 कोटींचा निधी जमवलाही आहे. पुरामुळे 200 गावांमधील लोकांना दुसऱया ठिकाणी हलवावे लागले आहे. यातून मार्ग काढण्यासाठीच येडियुरप्पा यांनी देशातील 60 उद्योगपतींना भेटून ही गावे दत्तक घेऊन ती वाचवा अशी गळ घातली आहे. नावासाठी तरी हे उद्योगपती निधी देतील असे येडियुरप्पा यांचे म्हणणे आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एनडीआरएफ आणि लष्कराने मोठय़ा प्रयासाने कर्नाटकातील 6 लाख 98 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

56 हजार घरांचे नुकसान

कर्नाटकात जवळपास 1160 मदत शिबिरे स्थापण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये किमान 4 लाख पूरग्रस्तांना स्वच्छ पाणी, जेवण आणि अन्य जीवनावश्यक बाबी पुरवल्या जात आहेत. सरकारी आकडय़ानुसार 103 तालुक्यांमधील 22 जिल्हे पूर आणि मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडले आहेत. यात 56 हजार 381 घरांचे प्रचंड नुकसान झाले असून 4 लाख 58 हजार हेक्टर क्षेत्र आणि शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या