अमरनाथ यात्रेवर अस्मानी संकट,पावसात वाहून गेला यात्रेचा मार्ग

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अमरनाथ यात्रेवर अस्मानी संकट कोसळले आहे. जागोजागी रस्ते खचले आहेत. तर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने अमरनाथ यात्रेचा मार्गच यात वाहून गेला आहे. यामुळे अनेक ठिकाणी यात्रेकरू अडकल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बालटाल आणि पहलगाम येथील लष्कराच्या तळावर यात्रेकरूंना थांबवण्यात आले आहे. तसेच जम्मुहून निघालेल्या भाविकांनाही वाटेतच थांबवण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-कश्मीरमध्ये पाऊस कोसळत आहे. यामुळे जागोजागी चिखलाचे डोंगर उभे राहिले आहेत. यामुळे यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर भररस्त्यात अडकले आहेत. लष्कराचे जवान यात्रेकरूंना मदत करण्याचे काम करत आहेत. मात्र संततधार पावसामुळे रस्त्यावरून चिखल हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. मध्येच यात्रा थांबवावी लागल्याने बालटाल येथील लष्कराच्या तळावर अनेकांनी आश्रय घेतला आहे.

अमरनाथ गुंफा येथून ८-९ किमी दूर अंतरावर आहे. यामुळे यात्रेकरू वेगाने मार्गक्रमण करत होते. मात्र पावसामुळे रस्तेच चिखलमातीखाली गेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटनाही घडल्या. तरीही यात्रेकरूंचा उत्साह मात्र कायम असून भाविक पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, झेलम नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून श्रीनगरमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने मदत कार्यासाठी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे.