गिरणा नदीच्या पुरामुळे महालपाटणेतील शेती उद्ध्वस्त; तीन एकरांवरील पिके वाहून गेली

531

सामना प्रतिनिधी । देवळा

गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे देवळा तालुक्यातील महालपाटणेसह तीन गावांमधील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात नदीकिनारची तीन एकर शेती वाहून गेल्याने चार शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासकीय यंत्रणेने येथील बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच न उघडल्याने हे नुकसान झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या कळवण व सुरगाणा तालुक्यातील पावसामुळे चणकापूर व पुनंद धरणे भरली आहेत. या धरणांतून गिरणा नदीत मोठ्य़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. महापुरामुळे गेल्या चाळीस वर्षांत प्रथमच महालपाटणे, धांद्री, निंबोळा आदी गावांतील शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. महालपाटणे येथे नदीवर कोल्हापूर टाइप बंधारा बांधला आहे. विसर्ग वाढताच बंधाऱयाचे दरवाजे उघडणे आवश्यक होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसर जलमय झाला. फक्त बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत उघडले नाहीत म्हणून शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांना दोषी धरून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱयांनी केली आहे.

पंचनामे केले नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी
पुराचे पाणी काठावरील शेतीत घुसल्याने दोन्ही बाजूची सुमारे तीन एकर शेती वाहून गेली. बाबुराव पोपट चव्हाण (धांद्री) यांची दोन एकर, गणेश मोतीराम आहिरे (धांद्री) व अरुण पोपट आहिरे (महालपाटणे) यांची प्रत्येकी 10 गुंठे, तर काशीनाथ दगा आहिरे (महालपाटणे) यांच्या 15 गुंठे शेतीतील मका, बाजरी ही पिके वाहून गेली आहेत. अद्यापपर्यंत प्रशासकीय यंत्रणेने पंचनामा केला नसल्याने शेतकऱयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या