लांजा,राजापूरातील पूर ओसरला; चिंद्रवलीतील रस्ता खचला

सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर लांजा आणि राजापूरातील पूर ओसरला आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिंद्रवली निरखुणेवाडी येथील रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

रविवार आणि सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. काजळी नदीने इशारा पातळी ओलांडल्याने मुंबई -गोवा महामार्गावरील आंजणारी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पावसाचा जोर कमी होताच या पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. चिंद्रवली निरखुणेवाडी येथील रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. केळ्ये ठिकवाडी विश्वेश्वर मंदिरासमोरील रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपले आहे. गेल्या 24 तासात लांजा तालुक्यात तब्बल 334 मिमी पाऊस पडला. त्या व्यतिरिक्त मंडणगड मध्ये 170 मिमी, दापोलीत 128 मिमी,खेड 112 मिमी,गुहागर 32 मिमी,चिपळूण 140 मिमी,संगमेश्वर 144 मिमी,रत्नागिरी 115 मिमी आणि राजापूरात 65 मिमी पाऊस पडला.जिल्ह्यात सरासरी 137.78 मिमी पाऊस पडला.