विश्वासदर्शक ठरावावर चर्चा,कुमारस्वामी सरकारची गुरुवारी सत्त्वपरीक्षा

81

सामना ऑनलाईन, बंगळुरू

कर्नाटकात सत्तेसाठी सुरू झालेली साठमारी गुरुवारी संपणार आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी गुरुवारी सभागृहात बहुमत सिद्ध करणार आहेत. गेल्या आठवडय़ात कुमारस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे बहुमत सिद्ध करण्याची परवानगी मागितली होती.

कर्नाटकात काँग्रेसच्या 13 व जदयूच्या 3 आमदारांनी बंडखोरी करून राजीनामा दिल्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार संकटात सापडले होते. विधानसभा अध्यक्ष के. रमेशकुमार यांनी 13 पैकी 8 आमदारांचे राजीनामे वैध नसल्याचे स्पष्ट केल्याने हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला. सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आणि बंडखोरांच्या राजीनाम्यावर लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बंडखोरांना शह देत विधानसभा अध्यक्षांकडे बहुमत सिद्ध करण्याची परवानगी मागितली.

मुख्यमंत्री कुमारस्वामी हे गुरुवारी विधानसभेत एका ओळीचा विश्वासदर्शक ठराव मांडतील आणि त्यावर चर्चा होऊन मतदान घेण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे राजधानी बंगळुरूमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज सकाळी काँग्रेसने संसदीय गटाची बैठक बोलावून आमदारांना व्हीप जारी केला. दुसरीकडे भाजपने कुमारस्वामी सरकारने विश्वास गमावला असून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे. भाजपच्या सदस्यांनी आजच बहुमत सिद्ध करावे अशी मागणी केली, मात्र ती फेटाळण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या