गणेशोत्सवात फुले कोमेजली; अवकाळी पावसाचा फुलशेतीला फटका

स्थानिक आवक घटल्याने दर वाढले

कोरोनो संसर्गाच्या दोन वर्षांनंतर उत्सवांना उधाण आले. तरी ऐन गणेशोत्सवात फुले कोमेजली आहेत. अवकाळी पावसाचा फुलशेतीला फटका बसल्यामुळे फुलांचे दर वाढले आहेत. धुळे शहरातील बाजारपेठेत निशिगंधा 400 रुपये किलो, झेंडू 120 किलो, गुलाब प्रतिनग 10 रुपये अशा महागडय़ा दराने गणेशभक्तांना फुले खरेदी करावी लागत आहेत.

धुळे जिह्यातील बहुसंख्य शेतकरी पारंपरिक शेती न करता फुलशेतीकडे वळले आहेत. मात्र अवकाळी पावसात शेतकऱयांना नुकसान सहन करावे लागले. उत्पादन खर्चही निघणार नाही अशी वेळ शेतकऱयांवर आली आहे. सध्या सण-उत्सवांचा माहौल आहे. धार्मिक कार्यक्रमात फुलांची मागणीही वाढली आहे. यासाठी नजीकच्या नाशिक, संगमनेर, पुणे, चांदवड भागांतून फुलांची आवक केली जात आहे. याचा परिणाम फुलांच्या विक्रीवर झाला आहे.

  • सध्या बाजारात गुलाब प्रतिनग 10 रुपये, डच गुलाब 30 रुपये नग, शेवंती 400 रुपये क्विंटल, निशिगंधा 400 रुपये किलो, झेंडू 120 रुपये किलो दराने फुले विकली जात आहेत.
  • येत्या काळात शिक्षक दिन, गौरी पूजन इतरही सण लागून येणार आहेत. त्यासाठीही फुलांची मागणी वाढेल. मात्र स्थानिक पातळीवर अल्पशा प्रमाणात फुले उपलब्ध असल्यामुळे बाहेरगावाहून मागणी करावी लागणार आहे. त्यामुळे फुलांच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

राजेंद्र गवळे, सावता फूल भांडार