
हिवाळ्यात सर्दी, फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ओपीडीमध्ये इन्फ्लुएंझाचे जास्त रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या अवस्थेत आता फ्लूचा शॉट म्हणजेच फ्लूची लस घ्यावी की नाही या संभ्रमात अनेकजण आहेत. याचे कारण म्हणजे चीनमधील कोरोनाचा कहर.
खरं तर, बहुतेक लोकांनी अजून बूस्टर डोस घेतलेला नाही. आता त्यांना तो घ्यायचा आहे. अशा परिस्थितीत दोन्ही लस एकत्र घेता येतील की नाही असा संभ्रम आहे.
फ्लू शॉट किंवा फ्लू जॅब ही एक लस आहे जी आपल्या शरीराचे इन्फ्लूएंझा विषाणूपासून संरक्षण करते. ही लस मिळाल्यानंतर शरीरात इन्फ्लूएंझा विषाणूविरूद्ध प्रतिपिंडे म्हणजेच अँटिबॉडी तयार होतात. त्यामुळे विषाणू शरीरावर हल्ला करण्याआधीच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते आणि आपण आजारी पडण्यापासून वाचतो. फ्लूचा विषाणू खूप लवकर बदलतो. यामुळे, फ्लूची लस दरवर्षी नवीन येते. म्हणूनच दरवर्षी फ्लूचा शॉट घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने फ्लूचा शॉट घेतला पाहिजे. ज्यांना फ्लू होण्याची शक्यता जास्त आहे त्यांनी तो घेण्यात हलगर्जीपणा करू नये. लहान मुले, वृद्ध, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक किंवा कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनी वेळेवर फ्लूचे शॉट्स घ्यावेत. फ्लू शॉटची नवीन आवृत्ती दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर आणि मार्च-एप्रिल दरम्यान बाहेर येते.
फ्लूचा शॉट घेणे किती महत्त्वाचे आहे?
फ्लूचा शॉट घेणे फार महत्वाचे आहे. कोरोना महामारीप्रमाणेच इन्फ्लूएंझा विषाणूमुळेही साथीचे रोग पसरले आहेत. हा विषाणू दरवर्षी त्याचे स्वरूप बदलतो. हिंदुस्थानातील अनेक लोक मधुमेह, हृदयविकार आणि कमकुवत प्रतिकारशक्तीने त्रस्त आहेत. अशा लोकांनी फ्लू शॉट घेणे आवश्यक आहे. इन्फ्लूएंझा विषाणूमुळे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच त्याची लस घेणे आवश्यक आहे. फ्लूचा शॉट सहसा हाताच्या वरच्या भागात इंजेक्शनद्वारे दिला जातो. तो घेण्याची प्रक्रिया फार लवकर संपते आणि त्यात विशेष वेदनाही होत नाही. फ्लूचा शॉट घेण्यापूर्वी आपला हात हलवा. शॉट घेतल्यानंतरही हात हलका हलवत राहा. त्यामुळे त्रास थोडा कमी होईल.
कोरोनाच्या काळात फ्लूचा शॉट घेणे किती महत्त्वाचे आहे?
कोरोनाच्या काळात फ्लू शॉट घेणे खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक, फ्लूमुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे कोरोना व्हायरस सहज हल्ला करू शकतो. तसेच, जर एखाद्याला कोविड आणि फ्लू एकत्र झाला तर रुग्णाची स्थिती घातक ठरू शकते.
फ्लू शॉटचे काही किरकोळ दुष्परिणाम आहेत…
ज्या ठिकाणी शॉट दिला गेला त्या ठिकाणी वेदना आणि सूज येऊ शकते.
स्नायूंमध्ये वेदना आणि ताण जाणवू शकतो.
फ्लू शॉट घेतल्यानंतर डोकेदुखी देखील होऊ शकते.
काही लोकांना ताप येऊ शकतो.
नाक गळणे किंवा ऍलर्जी होऊ शकते.
शरीरात सूज, श्वासोच्छवासाचा त्रास, हृदय गती वाढणे किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
आपण फ्लूच्या शॉटसोबत कोरोनाची लस घेऊ शकतो का?
दोन-तीन लसी एकत्र घेणे ही नवीन गोष्ट नाही. लहान मुलांना एकाच वेळी अनेक प्रकारच्या लस दिल्या जातात. तुम्ही फ्लूचा शॉट आणि कोरोनाची लस एकत्र घेऊ शकता. यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. फ्लूचा शॉट आणि कोरोनाची लस एकत्र घेतल्याने कोणतीही गंभीर हानी होणार नाही. दोन्ही लसींचे काही दुष्परिणाम आहेत. जर दोन्ही एकत्र घेतल्या तर हे दुष्परिणाम तुम्हाला एकत्र त्रास देऊ शकतात. यामुळे जिथे लस दिली गेली आहे तिथे जास्त वेदना आणि सूज येऊ शकते. काही लोकांना ताप येऊ शकतो. डोकेदुखी देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत तापमान कमी करण्यासाठी तापाचे औषध घेतले जाऊ शकते.
लसीकरण करताना कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी?
जर रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असेल किंवा कोणतेही विशेष प्रत्यारोपण केले गेले असेल, तर डॉक्टरांशी बोलल्यानंतरच कोणतीही लस घ्या. कारण या लोकांसाठी प्रत्येक लस योग्य नसते. याशिवाय, इतर कोणतीही वैद्यकीय स्थिती असल्यास, लसीकरण करण्यापूर्वी डॉक्टरांशी बोला.
फ्लूची लस घेतल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो
स्पेनमधील अल्काला विद्यापीठात केलेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की फ्लूमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. या कारणास्तव, फ्लू शॉट घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. हृदयविकार असलेल्या लोकांमध्ये फ्लूमुळे गुंतागुंत वाढू शकते.