तव्यावरून थेट ताटात! काळबादेवीतला फ्लाईंग डोसा होतोय व्हायरल!

मसाला डोसा, म्हैसूर डोसा अशा डोश्यांच्या विविध प्रकारांबद्दल आपण आजवर ऐकलंय. पण फ्लाईंग डोसाची चव कधी तुम्ही चाखलीय? फ्लाईंग डोसा म्हणजे नक्की काय प्रकार आहे, असा प्रश्न सहाजिकच तुम्हाला पडला असेल. सोशल मीडियावर सध्या दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथील एका डोसा विक्रेत्याचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आलाय तो त्याच्या सर्व्ह करण्याच्या अनोख्या शैलीमुळे. तव्यावर तयार झालेला गरमागरम डोसा हा विक्रेता अशाप्रकारे उंच हवेत उडवतो की तो थेट खवय्यांच्या ताटातच जाऊन पडतो. त्यामुळे खवय्यांनीच याचं फ्लाईंग डोसा असं नामकरण केलंय.

दक्षिण मुंबईतील मंगलदास मार्केट येथील श्री बालाजी डोसा येथील हा व्हिडीओ आहे. स्ट्रीट फुड रेसिपी या पेजवर 12 फेब्रुवारीला हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. 3 मिनिट आणि 40 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. यात डोसा विक्रेता एकाचवेळी तीन तव्यावर डोसा बनवताना दिसतोय. परंतू खरी गंमत आहे ती डोसा सर्व्ह करताना. डोसा सर्व्ह करण्याच्या विक्रेत्याच्या अनोख्या शैलीमुळे अल्पावधीतच हा व्हिडीओ लोकप्रिय ठरलाय. आतापर्यंत 80 मिलियन्सहून अधिक ह्यूज आणि 1.3 मिलियन लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. काही नेटिझन्सनी या डोसा विक्रेत्याच्या अनोख्या टॅलेंटचं काौतुक केलंय आहे तर काहींनी हा अन्नाचा अवमान असल्याचं म्हटलंय.

आपली प्रतिक्रिया द्या