मी शेजारच्या काकूसारखी दिसते म्हणूनच… `देवाची करणी’वरून झालेल्या टीकेला निर्मला सीतारामन यांचे उत्तर

‘मी शेजारच्या काकूसारखी दिसते म्हणूनच माझ्या वक्तव्यांची खिल्ली उडवली जाते’ अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ‘कोरोना ही देवाची करणी आहे’ अशा त्यांच्या वक्तव्यावर टीका झाली होती. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जाणे हा बेजबाबदारपणा असल्याचे सीतारामन यांनी विरोधकांना उद्देशून म्हटले.

गेल्या 27 ऑगस्ट रोजी निर्मला सीतारामन यांनी हे वक्तव्य केले होते. देवाची करणी असलेल्या कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे असे त्या म्हणाल्या होत्या. त्यावरून विविध राजकीय पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठीच अर्थमंत्री असे विधान करत आहेत असा त्यांच्यावर आरोप झाला. निर्मला सीतारामन आज लोकसभेत बोलताना म्हणाल्या की, ‘जीएसटीच्या भरपाईवरून बोलतानाही आपला ‘देवाची करणी’ हा शब्द अनेकदा वापरला गेला. मला त्याचा आनंद आहे. विचित्र परिस्थितीबाबत वापरला जाणारा ‘फोर्स मज्युर’ हा लॅटिन शब्द लोक स्वीकारतात. पण एक साधीसुधी महिला अर्थमंत्री ‘कोरोना ही देवाची करणी आहे’ असे म्हणते तेव्हा त्यावरून उपहासात्मक टीका होते. हे काय आहे?’

जीएसटीबाबत केलेल्या आपल्या वक्तव्याचे समर्थनही सीतारामन यांनी यावेळी केले. त्या म्हणाल्या की, ‘केंद्र सरकार आपली जबाबदारी टाळत आहे असे म्हणणेच बेजबाबदारपणाचे आहे. मी तुमचे सल्ले ऐकण्यास तयार आहे थट्टा नाही. मला एकतरी असे राज्य सरकार दाखवा ज्यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आम्ही स्वतः सामना करतो असे म्हटले आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या