मुंबईकरांनो, आंबा पारखूनच विकत घ्या!

12

सामना ऑनलाईन, मुंबई

बाजारात हापूसचा धो धो पाऊस पडतोय. यंदा मोठय़ा प्रमाणावर आंबा आल्याने मुंबईकरांची चांगलीच चंगळ आहे. रोज आमरस-पुरीवर ताव मारला जातोय…पण जरा थांबा. तुम्ही खाताय तो आंबा सुरक्षित आहे ना? कारण सध्या कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांचा बाजारात अक्षरशŠ सुळसुळाट आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, आंबा पारखूनच विकत घ्या नाहीतर पोट धरून बसावे लागेल. उलटय़ा, जुलाब, जळजळ अशा आजारांना निमंत्रण मिळेल.

मुंबईत शीव (सायन) आणि दहिसर परिसरातून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केले. त्यामुळे आंबा खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. रासायनिक औषधांची फवारणी करून किंवा कार्बन पावडरचा वापर करून आंबे पिकवले जात आहेत. अशा आंब्यांचे सेवन केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊनच ‘एफडीए’ने कृत्रिमरीत्या आंबा पिकवणाऱया विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. असा आंबा जप्त केला जातोय.

घातक आंबे असे ओळखाल

  •  आंब्याला उग्र वास येतो
  •  काही भाग पांढरा दिसतो
  •  कार्बाईडच्या अतिवापरामुळे तो पांढरा होतो.
  •  आंब्याची चवही वेगळीच असते.

आंब्यांना दिले जातेय इंजेक्शन

अनेक भागांत तर अक्षरश: आंब्यांना रासायनिक इंजेक्शन देऊन ते पिकवले जात आहेत अशी माहिती ‘एफडीए’च्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली. काही व्यावसायिक किंवा विक्रेते अशाप्रकारे आंबा पिकवत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आल्या. त्यानंतर ‘एफडीए’ने अशा व्यावसायिक आणि विक्रेत्यांविरोधात मोहीमच उघडली. त्यानुसार संशयित वाटणाऱया आठ ते दहा आंब्यांचे नमुने तपासणी जप्त करण्यात आल्याचे आढाव यांनी सांगितले. दरम्यान, अन्नसुरक्षा आणि मानके कायदा २००६ अनुसार कार्बाईड पावडरचा वापर करून आंबा पिकवणाऱया विक्रेत्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचेही आढाव यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या