
सध्या ऑनलाइन फूड डिलिव्हरीचा ट्रेंड आहे. फार-फार तर चार ते पाच किमी अंतरापर्यंत फूड डिलिव्हरी बॉय ऑनलाइन फूड डिलिव्हरी करतात. मात्र एका मुलीने फूड डिलिव्हरी करण्यासाठी तब्बल 30 हजार किमी अंतर कापले आहे. 4 महाद्वीप पार करून ही मुलगी सिंगापूरहून अंटार्क्टिकाला पोहोचली. जगातील सर्वात लांब अंतरावरील फूड डिलिव्हरी म्हणून याकडे पाहिले जात आहे. मूळची चेन्नईची रहिवाशी असलेल्या मानसा गोपाल हिने ही किमया करून दाखवली आहे. या संदर्भातला व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओत दिसतेय की, फूड पॅकेट्स घेऊन मानसा हिने सिंगापूरहून प्रवासाला सुरुवात केली. यानंतर जर्मनीतील हॅम्बर्ग त्यानंतर अर्जेंटिनामधील ब्युनोस मार्गे ती मानसा अंटार्क्टिकाला पोहोचली आणि नियोजित ग्राहकापर्यंत ऑर्डर पोहोचवली. वाटेत बर्फाळ डोंगर आणि चिखलमय रस्ते पार करताना ती दिसतेय. गेल्या महिन्यात फूड पांडाने तिची ही ट्रिप स्पॉन्सर केली.