का थकतो आपण?

4297

>> डॉ. अविनाश भोंडवे

वैद्यकीय आकडेवारीनुसार हा थकवा वयातीत आहे. अगदी तंदुरुस्त तरुण असो, कुठलाही आजार नसलेली धडधाकट प्रौढ व्यक्ती असो किंवा जराजर्जर वृध्द असो, अकारण आलेला कमालीचा थकवा सर्वांनाच जाणवतो. या थकव्याची सर्वसामान्य कारणे आजच्या जीवनशैलीत आहेत. ती समजून घेतली आणि त्यांचे निराकरण केले तर गमावलेला उत्साह पुन्हा कसा मिळवता येईल याची जाणीव सर्वांनाच खूप उपयुक्त ठरू शकेल.

दिल ढूंढता है फिर वही, फुरसत के रात दिन कवी गुलजारजींचे हे शब्द आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला सततच जाणवत राहतात. काहींना प्रत्यक्ष तर अनेकांना अप्रत्यक्ष रीतीने! आयुष्यातली कर्तव्ये आणि जबाबदाऱया पार पाडताना प्रत्येकाचाच आज जीव मेटाकुटीला येतोय. रस्त्यावरून जाता येताना, कामावर, समारंभात आजूबाजूच्या लोकांचे सूक्ष्म निरीक्षण केले तर दहातल्या चार लोकांच्या चेहऱयावर एक कायमचा थकवा, त्रासिकपणा आणि मरगळ दिसून येते. सकाळी उठल्यापासून रात्री बिछान्यावर आडवे होईपर्यंत या ‘दमलेल्या बाबांची कहाणी’ सर्वसाधारणपणे सारखीच असते.

वैद्यकीय आकडेवारीनुसार हा थकवा वयातीत आहे. अगदी तंदुरुस्त तरुण असो, कुठलाही आजार नसलेली धडधाकट प्रौढ व्यक्ती असो किंवा जराजर्जर वृध्द असो, अकारण आलेला कमालीचा थकवा सर्वांनाच जाणवतो. डॉक्टरांकडे येणाऱया, पण कुठलाही शारीरिक आजार नसणाऱया रुग्णांत, ‘मला आज खूप थकल्यासारखे वाटतेय’ आणि ‘मला आज काही न करता स्वस्थ झोपून राहावेसे वाटतेय’ या तक्रारींचे प्रमाण सुमारे तीस टक्के असते.

तसे पाहिले तर कुठल्याही आजाराचा परिणाम म्हणून किंवा अतिप्रमाणात शारीरिक काम केल्यावर थकवा येणे साहजिकच असते, पण कसलेही शारीरिक श्रम न होता आणि कुठल्याही आजाराची पुसटशी सावलीसुद्धा नसताना आज हे थकव्याचे, दमल्यासारखे वाटण्याचे आणि झोपावेसे वाटण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. या थकव्याची सर्वसामान्य कारणे आजच्या जीवनशैलीत आहेत. ती समजून घेतली आणि त्यांचे निराकरण केले तर गमावलेला उत्साह पुन्हा कसा मिळवता येईल याची जाणीव सर्वांनाच खूप उपयुक्त ठरू शकेल.

1. जंक फूड – आईस्क्रीम, पुडिंग्ज,केक्स, पेस्ट्रीज, ब्रेड, वेफर्स, कॅण्डी, सर्व प्रकारची चॉकलेट्स (मिल्क, डार्क, व्हाईट, क्रॅकर्स), पाय, पास्ता, नूडल्स अशांसारख्या पदार्थांनी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. या पदार्थांत कमालीची साखर आणि प्रक्रिया केलेले पिष्ठमय पदार्थ असतात. ते खाल्ल्यावर त्यांचे त्वरित साखरेत रूपांतर होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमालीचे वाढते. ते कमी करायला आपल्या स्वादुपिंडातून इन्सुलिन मोठय़ा प्रमाणात स्रवू लागते. हे पदार्थ सेवन केल्यावर अमर्याद वाढणारी आणि त्यानंतर इन्सुलिनमुळे लगेच खाली जाणारी साखरेची पातळी, या वर-खाली होणाऱ्या साखरेच्या खेळामुळे या व्यक्तींना थकवा जाणवतो. मग थकवा आला म्हणून ते पुन्हा हे पदार्थ खातात आणि मग आलटून पालटून येणाऱ्या थकव्याचे आणि खाण्याचे एक दुष्टचक्र सुरू होते.

याकरिता आहारात अशा प्रक्रियायुक्त पिष्ठमय पदार्थांचे आणि गोड पदार्थांचे सेवन न करता पालेभाज्या, मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी, कोशिंबिरी, फळे यांचा वापर असणे आवश्यक असते, ज्याने पोट भरते आणि साखरेची पातळी अशी कमी-जास्त होत नाही आणि शरीराचा उत्साह टिकून राहतो.

2. बैठी जीवनशैली- रोजचे बैठे काम आणि कामानिमित्त होणाऱया धावाधावीसाठी वाहनांचा वापर, इतर हालचालींसाठी यांत्रिक साधनांचा वापर यामुळे शरीराच्या स्नायूंची आणि सांध्यांची पुरेशी हालचाल होतच नाही. त्यायोगे होणारे रुधिराभिसरण होत नाही साहजिकच त्यामुळे ‘आळस’ वाढीला लागतो. यातूनच सतत थकल्यासारखे वाटण्याची भावना निर्माण होते. ‘क्रॉनिक फटिग सिंड्रोम’ या विकाराने त्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढीला लागण्याचे बैठी जीवनशैली हे एक महत्त्वाचे कारण आहे, पण इतर कुठलाही आजार नसला तरी ही बसकण मारणारी जीवन पद्धती कुठल्याही निरोगी व्यक्तीतसुद्धा शारीरिक थकव्याची बैठक निर्माण करते.

नियमित थोडा जरी व्यायाम केला आणि शरीराला हलते-चालते ठेवले, दररोज 25-30 मिनिटे शारीरिक व्यायाम केला तर हा थकवा नक्की आणि कायमचा दूर होऊ शकतो. अनेक वैद्यकीय चाचण्या आणि सर्वेक्षणातून हे सिद्ध झाले आहे.

3. अनियमित आणि अपुरी झोप- निद्रावस्थेत असताना आपल्या शरीराची चयापचय क्रिया अनेक महत्त्वाच्या गोष्टी पार पडत असते. त्यात शरीराची शारीरिक झीज भरून काढणे, अनेक संप्रेरकांच्या पातळी व्यवस्थित राखून ऊर्जा घटक साठवून ठेवणे आणि शरीरांतर्गत क्रियांचे संयोजन करणे अशा अनेक महत्त्वाच्या बाबी घडत असतात. आपल्या मेंदूत घडणाऱया अनैच्छिक क्रिया आणि स्मृती यांचे संतुलनसुद्धा झोपेशी निगडित असते. योग्य वेळी आणि योग्य कालावधीची झोप शरीराला, मनाला आणि बुद्धीला तजेला आणि जोम प्राप्त करून देते. साहजिकच एखाद्या व्यक्तीला   सातत्याने अपुरी झोप मिळत असेल तर त्याला कमालीचा शारीरिक आणि बौद्धिक थकवा जाणवतो. झोपेच्या अभावाने जर शारीरिक थकवा जाणवत असेल तर आवश्यक तेवढय़ा झोपेशिवाय तरणोपाय नसतो.

आजच्या जीवनशैलीत रात्रपाळीत काम करून दिवसा झोपणे काही व्यक्तींना भाग पडते. आपल्या शरीराच्या गरजेनुसार रात्रीची पुरेशी झोप ही उत्साहवर्धक असते. दिवसा घेतली जाणारी झोप अपुरी राहिल्याने या व्यक्ती अनिर्बंध थकव्याला बळी पडतात. आपला दिनक्रम बदलणे त्यांच्या हातात नसते. रात्रपाळीचे डॉक्टर, नर्सेस, पोलीस, पहारेकरी, ड्रायव्हर, आयटी क्षेत्रातील कर्मचारी यांना या गोष्टींचा हमखास त्रास जाणवतो.

(पूर्वार्ध)

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या