जेवण आवडल्याने ग्राहकाने दिली १ लाखांची टीप

47

सामना ऑनलाईन,बर्मिंगहम

दर्दी,खवय्ये यांना जेव्हा उत्तम जेवण मिळतं तेव्हा ते टीप द्यायला मागेपुढे बघत नाही. अशाच एका खवय्याने जेवण आवडल्याने तब्बल १ लाख रूपयांची टीप देऊ केली. ज्या हॉटेलमध्ये हा खवय्या गेला होता ते हॉटेल इंग्लंडमधील उत्तरी आयर्लंड भागात आहे. हे हॉटेल हिंदुस्थानी माणसाचं आहे हे विशेष

हा खवय्या त्याच्या ५ मित्रांसोबत ‘इंडियन ट्री रेस्‍टॉरेंट’मध्ये आला होता. इंग्लंडमध्ये हिंदुस्थानी मसाले वापरून बनवलेले पदार्थ प्रचंड आवडीने खाल्ले जातात. या व्यक्तीने देखील हिंदुस्थानी पदार्थ त्याच्यासाठी आणि त्यटाच्या साथीदारांसाठी मागवले होते, हे पदार्थ त्यांना इतके आवडले की त्यांनी १ हजार पाऊंडची टीप हॉटेलला दिली. त्यांचं बिल फक्त ७९.५ पाऊंड म्हणजे जवळपास साडे सहा हजार रूपये झालं होतं.

या ग्राहकाने हॉटेलचे व्यवस्थापक लुना इकूश आणि शेफ बाबू यांच्या नावे एक संदेशही लिहून ठेवला होता ज्यात त्याने म्हटलंय की “अत्यंत उत्तम जेवण होतं, कृपा करून तुमच्या रेस्टॉरंटसाठी ही छोटीशी भेट स्वीकार करावी, लवकरच भेटू”

या घटनेमुळे हॉटेलचे मालक आणि कर्मचारी वर्ग प्रचंड खूष आहे. खासकरून शेफ बाबू यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यांचे जेवण अत्यंत प्रसिद्ध आहे, असं सांगितलं जातं की जेव्हा ते एक हॉटेल सोडून दुसऱ्या हॉटेलमध्ये जातात तेव्हा खवय्ये देखील त्यांचं रेस्टॉरंट बदलतात. ज्या ग्राहकाने टीप दिली तो ग्राहक या रेस्टॉरंडमध्ये २००२ सालापासून येत असल्याचं सांगण्यात आलं. या हॉटेलला मिळालेली ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी टीप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या