अन्नातून विषबाधा झाल्याने सख्ख्या भावंडांचा मृत्यू, राहता तालुक्यातील घटना

अन्नातून विषबाधा झाल्याने सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना राहाता तालुक्यातील पाथरे येथे घडली आहे. या चिमुकल्यांची आजी व मामा अत्यवस्थ असून, त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अरहान वसीम शेख (वय 5), आयेशा वसीम शेख (वय 4) अशी मृत बालकांची नावे असून, मामा शाविद अझिझ शेख आणि आजी शबाना शेख यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पाथरे बु. येथील प्रवरा नदीच्या कडेला असणाऱया मुलाणी गल्लीत वसीम रज्जाक शेख हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. आठवडे बाजारात भाजीपाला विकून ते आपली उपजीविका चालवितात. वसीम यांना अरहान व मुलगी आयेशा ही दोन आपत्ये असून, त्यांची सासुरवाडी जवळच असलेल्या हणमंतगाव येथे आहे. दोन-तीन दिवसांपासून अरहान व आयेशा मामा शाविद यांच्या घरी गेले होते.

दरम्यान, अरहान, आयेशा आणि शाविद आणि आजी शबाना यांना अस्वस्थता जाणवल्याने त्यांनी सोनगाव सात्रळ येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले. मात्र, रविवारी सकाळी चौघांचीही प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, अरहान याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासात आयेशाचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचा मानसिक धक्का बसल्याने शाविद यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. आजी शबाना यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी लोणी पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक संतोष लांडे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या