अल्झायमरला रोखून मेंदू तल्लख करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश…

शरीरातील महत्त्वाचा आणि अविश्रांत काम करणारा अवयव म्हणजे मेंदू. रात्री शरीर विश्रांती घेत असतानाही मेंदू कार्यरत असतो. तसेच मेंदूचा परिणाम सर्व शरीरावर होतअसल्याने मेंदूची विशेष काळजी घेण्याची गरज असते. मेंदूच्या आजारांमध्ये अल्झायमरचा धोका जास्त असतो. अल्झायमरमध्ये व्यक्तीला विस्मृती होते. कधीकधी तो कटुंबियांनाही विसरतो. अल्झायमरबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी 21 सप्टेंबरला जागतिक अल्झायमर दिन पाळण्यात येतो. अल्झायमरवर कोणताही उपचार नाही. मात्र, आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास अल्झायमर रोखून मेंदू तल्लख होण्यास मदत होते.

शरीराचा उत्साह टिकून दिवसभर उर्जा मिळण्यासाठी प्रोटीन्सची गरज असते. त्यामुळे प्रोटीन्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. त्याचप्रमाणे दिवसभरात कमीतकमी आठ ग्लास पाणी प्यावे. फॅटी फिशमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील बिटा अमाइलॉयइचे प्रमाण नियंत्रित राहते. या घटकामुळे मेंदूतील रक्ताभिरणाला बाधा निर्माण होत असल्याने अल्झायमरचा धोका असतो. त्यामुळे याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनवेळा फॅटी फिशचा आहारात समावेश करावा.

अक्रोडमध्ये प्रोटीन आणि शरीराला आवश्यक असणारे फॅट मोठ्या प्रमाणात असतात. तसेच अक्रोडच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते. अक्रोडमध्ये वेगळ्या प्रकारचे ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. त्याला अल्फा लिनोलेनिक अॅसिड म्हणातात. त्यामुळे रक्तदाबाची समस्या कमी होते. तसेच रक्तवाहिन्यांची बळकटी वाढते. अक्रोड हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ब्रोकलीमध्ये विटामीन के मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे नर्वस सिस्ट्रमला (मज्जातंतूची यंत्रणा) बळकटी मिळते. तूर, मूग, उडद या पूर्ण डाळींचा आहारात समावेश करावा. पॉलिश किंवा कोणतेही प्रक्रिया केलेले धान्य वापरू नये. त्याचप्रमाणे आहारात कडधान्यांचाही समावेश करावा. या धान्यांमध्ये कार्बोहायड्रेड, ओमेगा 3, विटामीन बी मोठ्या प्रमाणात असते. मेंदूच्या विकासासाठी ते आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यांच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे आहारात या पदार्थांचा समावेश करून मेंदू तल्लख राखता येतो.

आपली प्रतिक्रिया द्या