‘पीएसजी’ची अटलांटला ‘किक’; चॅम्पियन्स लीग फुटबॉल

204

एरिक मोटिंग याने 93व्या मिनिटाला केलेल्या जबरदस्त गोलच्या जोरावर पॅरिस सेण्ट जर्मेनने (पीएसजी) बुधवारी मध्यरात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अटलांटा संघाला 2-1 अशा फरकाने हरवले आणि चॅम्पियन्स लीग या युरोपमधील प्रतिष्ठत फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. आता त्यांची लढत आरबी लेपजिग – ऍटलेटिको माद्रिद यांच्यामधील विजेत्याशी होणार आहे.

मारियो पॅसालिच याने 26व्या मिनिटाला गोल करीत अटलांटासाठी शानदार सुरुवात केली. पूर्वार्धात ही आघाडी कायम ठेवण्यात अटलांटा संघाला यश लाभले. उत्तरार्धातही दोन्ही संघांकडून गोल करण्याचे प्रयत्न करण्यात आले. अखेरीस मारक्वीनहोसने 90व्या आणि एरिक मोटिंगने 93व्या मिनिटाला गोल करीत पीएसजीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एरिक मोटिंगचा करार दोन महिन्यांसाठी वाढवण्यात आला होता. या खेळाडूने संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला हे विशेष.

आता लक्ष्य फायनल -नेमार

या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आमच्या संघाने दमदार खेळ केलाय. वार्मअप असो किंवा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास, खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिलीय. आता मला फायनलपर्यंत पोहोचायचे आहे. कोणीही मला यापासून रोखू शकत नाही, अशी भावुक प्रतिक्रिया नेमारने यावेळी दिली.

मोठी झेप

पीएसजी संघाने या मोसमात मोठी झेप घेतली. 1995 सालानंतर युरोपमधील एलिट क्लबच्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात त्यांना यश लाभले आहे. तसेच कतारीकडून क्लबची मालकी घेण्यात आल्यापासून पहिल्यांदाच त्यांनी चॅम्पियन्स लीगच्या अंतिम चारमध्ये प्रवेश केलाय.

आपली प्रतिक्रिया द्या