फुटबॉल लिजेंड मॅराडोना यांची एक्झिट

सर्वोत्तम आक्रमक मिडफिल्डर, सेपंड स्ट्रायकर… पासिंग, बॉल पंट्रोलिंग अन् पासिंगचे बादशहा… अर्जेंटिनाला एकाहाती वर्ल्ड कप जिंकून देणारे… असे अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच ब्रेन सर्जरीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 11 नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. दिएगो मॅराडोना यांच्या निधनानंतर क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात आली.

91 सामन्यांत 34 गोल

दिएगो मॅराडोना यांनी अर्जेंटिनासाठी 91 सामन्यांमध्ये 34 गोल करीत आपली धमक दाखवून दिली. दिएगो मॅराडोना यांनी आपल्या कारकीर्दीत अर्जेंटिनोस ज्युनियर, बोका ज्युनियर्स, बार्सिलोना, नापोली, सेवीला, न्यू वेल्स ओल्ड बॉईज या क्लबचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी एपूण 491 लढतींमध्ये 259 गोल करण्याचा करिष्मा केला. अर्जेंटिनासाठी 20 वर्षांखालील गटात खेळताना त्यांनी 15 सामन्यांमधून आठ गोल केले.

आठव्या वर्षीच दिसली गुणवत्ता

प्रशिक्षक फ्रान्सिस्को कोरनेजो यांनी दिएगो मॅराडोना यांच्यामधील गुणवत्ता वयाच्या आठव्या वर्षीच हेरली. अर्जेटिनोस ज्युनियर संघासाठी ट्रायलसाठी आला असताना त्याच्यातील गुणवत्ता पाहून फ्रान्सिस्को कोरनेजो आश्चर्यचकित झाले. अखेर दिएगो मॅराडोना यांनी पुढे जाऊन इतिहास रचला.

हॅण्ड ऑफ गॉड, वर्ल्ड चॅम्पियन

दिएगो मॅराडोना यांच्यासाठी 1986 हे वर्ष स्पेशल ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने मेक्सिको येथे पार पडलेला वर्ल्ड कप जिंकण्याची करामत करून दाखवली. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाने 2-1 अशा फरकाने बाजी मारली. दिएगो मॅराडोना यांनी या लढतीत केलेले दोन्ही गोल लाजवाब होते. यामधील एक गोल करताना दिएगो मॅराडोना यांचा हात फुटबॉलला लागला होता, पण पंचांना ते दिसले नाही. या गोलला ‘हॅण्ड ऑफ गॉड’ असे संबोधले जाते. या स्पर्धेत पश्चिम जर्मनीला हरवून अर्जेंटिनाने चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला.

आपली प्रतिक्रिया द्या