चार जगज्जेते आणि दोन उपविजेते

फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविणाऱ्या आठ संघांपैकी चार जगज्जेते तर दोन उपविजेते संघ आहेत. त्याचबरोबर एका संघाने प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर एकाने तिसऱ्यांदा धडक मारली आहे. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत ब्राझील, अर्जेंटिना, फ्रान्स आणि इंग्लंड हे चार माजी जगज्जेते खेळतील, तर क्रोएशिया आणि नेदरलॅण्ड्स हे उपविजेते संघही उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी सज्ज झालेत. मात्र अखेरच्या उपांत्यपूर्व लढतीत फ्रान्स आणि इंग्लंड हे माजी जगज्जेते एकमेकांशी भिडतील.

युरोप आणि लॅटिनचेच वर्चस्व, आठपैकी सात संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

फुटबॉलची क्रेझ अवघ्या जगात पसरलीय. फिफा वर्ल्ड कपचे आयोजनही आता युरोप किंवा लॅटिन अमेरिकेपुरते मर्यादित राहिले नसून आफ्रिकन आणि आशियाई देशांमध्येही स्पर्धांचे अभूतपूर्व आयोजन केले जातेय. असे असले तरी फिफा वर्ल्ड कपच्या बाद फेरीवर आजही दबदबा फक्त आणि फक्त युरोप आणि लॅटिन अमेरिकन संघांचाच कायम आहे. यंदा अरब देशांत स्पर्धा होतेय; पण त्यांचा एकही संघ साखळी टप्पा ओलांडू शकला नाही. आशियाई संघांचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच धुळीस मिळाले आहे. मात्र शेवटच्या क्षणी मोरोक्कोने स्पेनला आऊट करून आफ्रिकन देशांची मान अभिमानाने उंचावलीय. तरीही उपउपांत्य फेरीत आठपैकी सात संघ आणि सत्ता युरोप आणि लॅटिन अमेरिकेचीच आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत आशियाचा किमान एक संघ असेल, अशी अपेक्षा होती. ऑस्ट्रेलिया, जपान आणि दक्षिण कोरियाने बाद फेरीत मजल मारून आशियाच्या आशाही उंचावल्या होत्या, पण हे तिन्ही संघ हरले. लॅटिन अमेरिकेची जान असलेल्या ब्राझीलने दक्षिण कोरियाचा धुव्वा उडवला तर अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. जपानने जोरदार लढत दिली, पण पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाविरुद्ध ते कमी पडले आणि आशियाचे हे तिन्ही दिग्गज उपांत्यपूर्व फेरीत पोहचूच शकले नाहीत. आशियाचे आव्हान संपल्यावर आफ्रिकन देशाची अंधूकशी आशा असलेल्या मोरोक्कोलाही स्पेनकडून धक्का मिळेल, असे प्रथमदर्शनी वाटत होते, पण मोरोक्कोने इतिहास रचला. पेनल्टी शूटआऊटमध्ये मोरोक्कोने स्पेनला एकही यशस्वी पेनल्टी कीक मारू दिली नाही आणि
3-0 असा वेदनादायी पराभव दिला. मोरोक्को जिंकला नसता तर उपांत्यपूर्व फेरीत खेळणारे आठही संघ परंपरागत युरोप आणि लॅटिन अमेरिकेचेच असते.

आफ्रिकन -आशियाई संघ उपांत्यपूर्व फेरीतच गुडघे टेकतात

उपांत्यपूर्व फेरीत तर या दोन खंडांच्या पलीकडे कोणाची झेपच जात नाही. 1982 सालापासून आठपैकी किमान संघ तर त्यांचेच आहेत. अपवाद केवळ 2002 साली जपान-दक्षिण कोरियात झालेल्या स्पर्धेचा. या स्पर्धेत 2 आशियाई आणि एक आफ्रिकन संघही उपांत्य फेरीत पोहोचला होता. पण त्यानंतर अशी मोठी मजल कधीही मारता आली नाही. त्याच वर्षी आशियाई आणि आफ्रिकन बाद फेरीत एकत्र होते, तशी वेळ पुन्हा आली नाही. 1994, 1998, 2006 आणि 2018 साली तर सर्वच्या सर्व संघ युरोपियन आणि लॅटिनच होते. 2010 साली प्रथमच लॅटिन अमेरिकेतल्या पाचपैकी चार संघांनी अंतिम आठमध्ये स्थान मिळविले होते, पण त्यांचा एकही संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला नव्हता. तसेच 2006 आणि 2018 साली लॅटिन अमेरिकेच्या एकाही संघाला उपांत्य फेरीतही धडक मारता आली नव्हती, मात्र या दोन्ही स्पर्धांमध्ये अंतिम चार संघ युरोपचेच होते.