प्रेमविवाह स्वीकारावा म्हणून त्यांनी तान्हुली सोडली आई-वडिलांच्या दारात

1780

प्रेमविवाह स्वीकारावा म्हणून एका जोडप्याने आपली 10 दिवसांची तान्हुली आई-वडिलांच्या दारात ठेवल्याचा प्रकार पालघर येथे घडला आहे. या जोडप्याला पोलिसांनी अटक केली असून तान्हुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पालघर इथल्या पडघे गावात ही घटना घडली. 18 ऑगस्ट रोजी रमेश शिंदे नावाच्या व्यक्तिने सकाळी घराचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना दारात एक तान्हुली मुलगी दिसली. बाळाविषयी कोणतीही पूर्वकल्पना नसलेल्या शिंदे यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मुलीच्या पालकांचा शोध घेत असताना पोलिसांना एक धक्कादायक शोध लागला. शिंदे यांच्या दारात सापडलेली तान्हुली ही त्यांच्याच मुलाची मुलगी असल्याचं पोलीस तपासात उघड झाली.

रमेश शिंदे यांचा मुलगा राहुल (25) याने त्याच्या आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध सरिता घाटळ (23) हिच्याशी प्रेमविवाह केला होता. पण, सरिता ही वेगळ्या जातीची असल्याने राहुलच्या आई-वडिलांनी त्यांच्या विवाहाला स्वीकारलं नव्हतं. काही काळाने सरिता गर्भवती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. तिच्या माहेरी या विवाहाची कल्पना होती. पण, राहुलच्या पालकांना मात्र नात झाल्याचं माहीत नव्हतं. त्यामुळे राहुलने त्यांना भावनिक आवाहन करायचं ठरवलं. राहुलच्या आई-वडिलांनी हा विवाह स्वीकारून आशीर्वाद द्यावेत म्हणून राहुलने 18 ऑगस्ट रोजी रात्री त्याची दहा दिवसांची मुलगी पालकांच्या घराबाहेर ठेवली आणि तो निघून गेला.

पोलिसांनी या दांपत्याला आणि या कृत्यात साथ देणाऱ्या सरिताच्या बहिणीला अटक केली आहे. बाळाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला काविळीची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे जे जे रुग्णालयात बाळावर उपचार सुरू आहेत. बाळाला आई-वडिलांकडे सोपवावं किंवा नाही याचा निर्णय होईपर्यंत बालसंगोपन संस्था बाळाची काळजी घेणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या