चेहरा उजळवा!

ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्याचं अप्रूप प्रत्येकीलाच असतं… यासाठी घरातीलच काही पदार्थांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी फेशियल करू शकता…
कोणत्याही प्रकारच्या फेशियलची सुरुवात क्लिंझिंगने करतात. घरगुती क्लिंझर तयार करण्यासाठी एक चमचा तांदळाच्या पिठात दही घालून पेस्ट तयार करा. या पेस्टने चेहरा आणि मानेला मसाज करा. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन टॉवेलने स्वच्छ पुसा.
क्लिंझिंग केल्यानंतर मसाज क्रीम तयार करण्याकरिता दुधाच्या सायीत बदाम तेलाचे काही थेंब घालून पेस्ट तयार करा. या पेस्टने चेहरा आणि मानेला हलक्या हातांनी व बोटांची टोके गोलाकार फिरवून मसाज करा. नंतर स्टीमरने वाफ घ्या. घरी स्टीमर नसेल तर एका पातेल्यात थोडे पाणी घेऊन त्यात कडुनिंबाची पाने टाकून ते पाणी उकळवावे. त्यानंतर टॉवल डोके आणि चेहरा झाकून ५ ते ७ मिनिटे वाफ घ्यावी. वाफ घेतल्यानंतर चेहऱ्याला फेसपॅक लावा. तेलकट त्वचा, कोरडी त्वचा आणि साधारण त्वचेकरिता फेसपॅकचे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतात.

टिप्स –
तेलकट त्वचेकरिता फेसपॅक
२ चमचे मुलतानी मातीमध्ये १ चमचा मध आणि गुलाब पाणी मिसळून चेहऱयाला लावा. हा फेसपॅक लावल्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा धुवा. टॉवेलने चेहरा स्वच्छ पुसा.

कोरड्या त्वचेकरिता फेसपॅक
२ चमचे मसूर डाळीच्या पिठात थोडेसे ऑलिव्ह ऑईल आणि ग्लिसरिन घालून केलेली पेस्ट चेहरा, मानेला लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवा. त्वचेचा पोत कोणता आहे याची माहिती करून घ्या.

साधारण त्वचेकरिता फेसपॅक
१ चमचा संत्र्याची पावडर आणि गुलाबपाणी एकत्र करून तयार केलेले मिश्रण चेहरा आणि मानेला लावा. अर्ध्या तासाने पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. भुवया आणि डोळ्यांच्या पापण्यांना फेसपॅक लागणार नाही, याची काळजी घ्या.