दार उघड, बयेss दार उघडsss! आरक्षणासाठी मराठा बांधवांचे भवानी मातेला साकडे

58

डॉ.सतीश महामुनी । तुळजापूर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या महाद्वारात गोंधळ घालून आज सकल मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वास प्रारंभ करण्यात आला. सुमारे एक तास चाललेल्या या पारंपारिक गोंधळातून मराठा समाजाच्या मागण्यांचे साकडे देवीस घालण्यात आले असून आगामी काळात मराठा समाजाचे मंत्री व आमदार यांनी एकत्रित येवून आरक्षणाच्या निर्णयासाठी प्रयत्न करावेत अन्यथा निवडणुकीच्या मैदानात कोणालाही सोडणार नाही, असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला.

सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने श्रीक्षेत्र तुळजापूरातून राज्यव्यापी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वास प्रारंभ करण्यात आला. यावेळी राज्य समन्वयक आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील किशोर पवार, नानासाहेब जावळे पाटील, जीवनराजे इंगळे, सुनील नागणे, आबासाहेब कापसे, सतीश खोपडे, नितीन पवार यांची उपस्थिती होती. शेकडो मराठा समाजाच्या तरुणांनी सकाळी दहा वाजल्यापासून भवानीरोड वर गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रॅलीस सुरुवात करण्यात आली.

यावेळी राज्याचे माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी शिवाजी चौक येवून मराठा आंदोलनात आपला सहभाग दिला. राणे समितीत आपण काम केल्याचे सांगून ही मागणी तात्काळ मान्य झाली पाहिजे ही आपली भूमिका असल्याचे सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जि. प. माजी अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक सुनील रोचकरी, शहराध्यक्ष भारत कदम यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी कॉग्रेसकडून नेते विनोद गंगणे, राज्य उपाध्यक्ष गोकुळ शिंदे , जि.प.उपाध्यक्षा अर्चना पाटील, नगराध्यक्षा अर्चना गंगणे, प्रभारी नगराध्यक्ष बापुसाहेब कने, नगरसेविका अश्विनी रोचकरी, नगरसेवक अविनाश गंगणे, अमर हंगरगेकर यांची उपस्थिती होती. तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटक शामल वडणे – पवार, भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा मीना सोमाजी, किरण निंबाळकर यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

रॅली भवानी रोडमार्गे तुळजाभवानी मंदिराकडे निघाली तेव्हा घोषणांनी तुळजापूर नगरी दुमदुमून निघाली, आई राजा उदो उदो.. सदानंदाचा उदो उदोच्या जयघोषात आरक्षण आमच्या हक्काचे… मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे… अशा विविध घोषणा देण्यात आल्या. दरम्यान यावेळी कोणाचेही स्वागत करण्यात आले नाही, कोणताही मानसन्मान न घेता समाजाची शक्तीसर्वश्रेष्ठ आहे ही एकी कायम राखण्यासाठी निर्धार व्यक्त करण्यात आला.

मंदिर महाद्वारा समोरील व्यासपीठावर देवीचे पारंपारिक गोंधळी राजाभाउ गायकवाड, संजय मोरे, अनिल रसाळ, संतोश रसाळ, रोहीत गायकवाड, सतीष रसाळ, नानासाहेब रसाळ, प्रकाश मोरे या गोंधळयांनी या गोंधळाशी लवकर या… या रचनेवर मराठा समाजाच्या प्रदीर्घ काळ मागणी होत असणाऱ्या मराठा आरक्षण, शैक्षणिक सवलती मिळाव्यात, शेतकऱ्याना संरक्षण मिळावे, कोपर्डीतील पीडीतेस न्यास मिळावा, अशा विविध मागण्यांचे साकडे देवीस घातले.
प्रतिकात्मक गोंधळाने उपस्थित मराठा तरुणांनी संबळाच्या तालावर देवीचा जयघोष केला.

गोंधळातून राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधून तातडीने आरक्षणाचा विषय मार्गी लावून सवलतीची घोषणा पत्रकार परिषदेत करावी इतर कोणतीही फसवी पत्रकार परिषद घेवू नये असा इशाराही दिला. यावेळी व्यासपीठांच्या खाली उभे राहून अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये रमेश केरेपाटील, सुनील नागणे, जीवनराजे इंगळे यांनी मनोगते व्यक्त केली.

राज्यसमन्वयक आबासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या मंत्री व आमदार यांनी एकत्रितपणे समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर गंभीरपणे विचार करावा, एकत्रितपणे हा निर्णय राबविण्यासाठी शासनावर दबाव आणावा अन्यथा मराठा समाज आगामी काळात कोणाचीही गय करणार नाही. मंत्री व आमदार यांना फिरणेही शक्य होणार नाही, अशी स्थिती निर्माण होईल. आंदोलन दरम्यान कोणी नेता होण्याचा प्रयत्न करु नका, हा समाजाचा लढा आहे. एकत्रित शक्ती आहे. तीच दिसली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी. आंदोलना दरम्यान गुन्हे दाखल झाल्यास घाबरु नका, धैयाने आंदोलनात पुढे या. मुख्यमंत्री फडणवीस यांना सत्तेत राहायचे असेल तर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यास सर्वस्तरातून दबाव कायम राहिला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. सज्जन साळुंके यांनी आभार तर किशोर पवार यांनी सूत्र संचालन केले. हजारो तरुणांच्या गर्दीने तुळजापूर मराठा आंदोलनमय झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या