नाशिकमध्ये हेल्मेट, सीटबेल्ट सक्तीची मोहीम

सामना ऑनलाइन ,नाशिक

 रस्ते अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी आणि बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आज नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे पाचशे अधिकारी, कर्मचाऱयांच्या फौजफाटय़ासह रस्त्यावर उतरले. पहिल्या सत्रात हेल्मेट न वापरणाऱया व सीटबेल्ट न लावणाऱया सुमारे बाराशे वाहनचालकांकडून एकूण दहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

हेल्मेट नसताना अपघात झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. चारचाकी वाहन चालक सीटबेल्ट न लावता वाहने चालवतात, अशावेळी अपघात झाल्यास त्यातही मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी, अपघाती मृत्यू टाळण्यासाठी नाशिक पोलिसांनी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेपासून ही मोहीम राबविली, ती दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होती. शहरात 26 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. झिकझॅक पद्धतीचे बॅरेकेडींग करून वाहने अडवून हेल्मेट नसणाऱया व सीटबेल्ट न लावलेल्या वाहन चालकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात आला. या कारवाईच्या शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. शहरात वेगात वाहने नसल्याने ही कारवाई हायवेला आणि शहराबाहेर करावी, दिवसा होणाऱया घरफोडय़ांकडे, वाढत्या गुन्हेगारीकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, असे मत व्यक्त करण्यात आले. हेल्मेट वापरणाऱया व सीटबेल्ट लावणाऱया वाहनचालकांचे पोलिसांनी तुळशीचे रोपटे व गुलाबपुष्प भेट देवून स्वागत केले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, शहर वाहतूकचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या पहिल्या सत्रात बाराशे वाहनचालकांवर केलेल्या कारवाईतून अंदाजे दहा लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दुपारी चार वाजेपासून या कारवाईचे दुसरे सत्र सुरू झाले, ते रात्री उशीरापर्यंत चालणार आहे.

हेल्मेट सक्तीची शपथ

नाशिकच्या गंगापूर नाका येथे नाशिक शहर पोलीस आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स यांच्या वतीने हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांना खालीलप्रमाणे शपथही देण्यात आली. ‘‘माझ्या कुटुंबीयांकरिता स्वतःच्या जिवाचे रक्षण करणे व त्याकरिता वाहतूक नियमांचे पालन करणे, हे माझे आद्यकर्तव्य आहे. मी आज या कायद्याचे पालन करण्याची हमी देत आहे. हेल्मेट ही सक्ती नसून जबाबदारी आहे, या भावनेने मी आज अशी शपथ घेत आहे की, आजपासून केव्हाही दुचाकी वापरताना मी हेल्मेटशिवाय प्रवास करणार नाही.’’

दुचाकीस्वारांना हेल्मेट आणि चारचाकी चालकांना सीटबेल्ट सक्तीच्या कारवाईसाठी नाशिक शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यामुळे मुंबई नाका सर्कलवर अशी वाहतूककोंडी झाली होती.

(सर्व छायाचित्रे भूषण पाटील)

 

हेल्मेट नसल्याने पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पळ काढणारा दुचाकीस्वार असा स्लिप झाला.