दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण – उपवनसंरक्षक शिवकुमार पोलीस कोठडीत

मेळघाटातल्या गुगामलच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण-मोहिते यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांची शनिवारी धारणी न्यायालयाने 29मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान वन विभागातल्या महिला कर्मचार्‍यांनी व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर शिवकुमार याच्या विरोधात निदर्शने करून त्याचा फोटो जाळत नारेबाजी केली.

दीपाली यांनी गुरुवारी रात्री हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी त्यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहली होती. त्यात दीपाली यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमुद करून अन्य गंभीर आरोप केले होते.

धारणी पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुरुवारी मध्यरात्रीनंतर दिपालीचे पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. शुक्रवारी त्याला फरार होत असताना नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला धारणी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. रात्रभर त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी शनिवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची 29 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या