अरण्य वाचन…गौतम ऋषींचे गौताळा

अनंत सोनवणे

सहा-सात वर्षांपूर्वी संभाजीनगरला कार्यालयीन कामासाठी गेलो होतो. सहकाऱयांना माझं जंगल वेड माहीत असल्यानं त्यांनी भटकंतीचा घाट घातला. दोन पत्रकार सहकाऱयांसोबत गौताळा वन्य जीव अभयारण्याच्या दाराशी जाऊन थडकलो आणि आश्चर्याचा पहिला धक्का बसला! अभयारण्य असूनही तिथं ना प्रवेशद्वार होतं, ना वनविभागाची चौकी! रेल्वे क्रॉसिंगला असतो तसा आडवा अडसर तेवढा होता. गाडीतून उतरून आम्हीच तो बाजूला केला आणि सहज आत गेलो. परवानगी विचारण्यापुरतंही तिथं वनविभागाचं अस्तित्व नव्हतं! डांबरी रस्त्याच्या एका वळणावर गाडी ठेवून आम्ही पायीच जंगलात शिरलो. गौताळा अभयारण्य म्हणजे शुष्क पानगळीचं जंगल. उन्हाळय़ाचे दिवस होते. हवेत उकाडा होता, तरी वारा पडलेला नव्हता. पानगळीचा मौसम होता. हवेच्या प्रत्येक झुळकीसरशी झाडांची सुकलेली पानं भिरभिरत खाली येत होती. जमिनीवर त्या पातेऱयाचा थर साचला होता. मनात आलं बाकीचं जंगल सोडा, नुसत्या पालापाचोळय़ाच्या या थरात किती मोठी जीवसृष्टी नांदत असेल?

त्या धावत्या भेटीत काही माकडं आणि नीलगाय सोडल्यास फारसं वन्यजीवन पाहता आलं नाही. पण ते देखणं जंगल कायम लक्षात राहिलं. संभाजीनगर आणि जळगाव जिल्हय़ांच्या सीमेवर वसलेलं ते जंगल सातमाळा आणि अनंता या सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलंय. साहजिकच इथली भौगोलिक रचना डोंगर-दऱयांची, चढ-उताराजवळच्या गौताळा गावावरून या अभयारण्याला त्याचं नाव मिळालं, तर गावाचं नाव गौतम ऋषींच्या नावावरून आलं असं म्हटलं जातं. आधी राखीव असलेलं हे जंगल तिथल्या जैवविविधतेमुळे १९८६ साली अभयारण्य म्हणून घोषित झालं. यालाच गौताळा औतराम घाट वन्य जीव अभयारण्यही म्हणतात.

gautala-2

सस्तन प्राण्यांमध्ये इथे बिबळय़ा, अस्वल, रानडुक्कर, नीलगाय,  चौशिंगा, चिंकारा, रानमांजर, उदमांजर, भेकर, मुगूंस, कोल्हा इत्यादी प्रजाती आढळतात. मात्र त्यांचं दर्शन होणं तेवढंसं सुलभ नाही. कारण अर्थातच इथली चढ-उताराची भौगोलिक रचना. सरपटणाऱया प्राण्यांमध्ये नाग, मण्यार, नाणेटी, अजगर वगैरे सापांसह घोरपडही इथे पहायला मिळते.

गौताळा वन्य जीव अभयारण्याची तीन प्रमुख वैशिष्टय़ं आहेत. एक म्हणजे इथं तुम्ही जंगलात पायी फिरू शकता. बहुसंख्य अभयारण्यांमध्ये हा आनंद घेता येत नाही. विशेषतः रानवाटा तुडवत पक्षी निरीक्षण करणं, आसपासची झाडं-झुडपं, कीटक-फुलपाखरांचा अभ्यास करणं शक्य होतं.

गौताळय़ाचं तिसरं वैशिष्टय़ मात्र दुर्दैवी आहे. इतकं सुंदर, संपन्न जंगल असूनही ते मोठय़ा प्रमाणावर दुर्लक्षित राहिलंय. आधीच पोटातून गेले. महामार्ग, खाणींचं उत्खनन यामुळे या परिसरावर कथित विकासाचा दबाव आहे. त्यातून उदासीनताही पदोपदी जाणवते. ती झटकून निसर्गानं दिलेलं दान जतन केलं, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या निसर्गप्रेमींसाठी ती मोठी पर्वणी ठरेल.

gautala-1

गोताळा वन्य जीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण…पायी भटकण्याचा आनंद

जिल्हा…संभाजीनगर

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…२६०.६१ चौ. कि.मी.

निर्मिती…१९८६

जवळचे रेल्वे स्थानक…चाळीसगाव (१२ कि.मी.)

जवळचा विमानतळ…संभाजीनगर (५५ कि.मी.)

निवास व्यवस्था…वनविभागाची विश्रामगृहं, चाळीसगाव व संभाजीनगर येथे खासगी हॉटेल्स.

सर्वाधिक योग्य हंगाम…ऑक्टोबर ते एप्रिल, पावसाळा

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस… नाही