अबब! दोन दिवसांच्या चहापानासाठी विद्यापीठाने खर्च केले दीड लाख

38

 

सामना ऑनलाईन । नागपूर
एखाद्या चहापानासाठी साधारण किती खर्च येतो? 10 रुपयांपासून ते अगदीच फाईव्ह स्टार चहा म्हटला तरी फारतर दीड दोन हजार रुपये. पण दोन दिवसांच्या चहापानाचं बिल तब्बल दीड लाख रुपये आलं तर? पण असं खरोखर झालं आहे. नागपूर विद्यापीठाच्या शिक्षण मंडळाने दोन दिवसांच्या चहापानाचं बिल दीड लाख रुपये लावल्याने चांगलाच गदारोळ माजला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने, नागपूर विद्यापीठातील शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमाशी संबंधित चर्चेसाठी एक बैठक बोलावली होती. दोन दिवस चाललेल्या या बैठकीसाठी तब्बल 99 कप चहा तर 25 कप कॉफी मागवल्या गेल्या आणि याचं बिल विद्यापीठाच्या लेखा विभागाकडे पाठवण्यात आलं. बिलाचा आकडा बघून लेखा विभागाचे डोळेच चक्रावले. त्यांनी ते बिल सरळ कुलगुरूंसमोर सादर केलं. कुलगुरू एस. पी. काणे यांनी बिलाची दीड लाख रुपये रक्कम बघून कुलगुरूंनी संबंधित विभागांना चौकशीचे आदेश दिले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नागपूर प्रतिनिधी वैभव बावणकर यांनी या प्रकाराबद्दल निषेध नोंदवला आहे. विद्यापीठाचा निधी हा विद्यार्थ्यांसाठी असताना चहापानावर केलेली अशी उधळपट्टी संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी बावणकर यांनी केली आहे. नागपूर विद्यापीठाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक विभागाला अशा चहापानासाठी एक विशिष्ट निधी मिळतो. कित्येक विभाग बिलाचा आकडा वाढवून सांगतात. मात्र, या विभागाने आकड्यांच्या सर्वच मर्यादा तोडल्याने ते पकडले गेले, असं विद्यापीठाच्या अधिकृत सूत्रांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या