हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षण मंत्रालयाला एक कोटीची देणगी

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही जवान मनाने नेहमी सैन्यातच असतात, याचा प्रत्यय नुकताच एका घटनेतून आला आहे. सैन्यासाठी काहीतरी करावे, अशी भावना त्यांच्यात नेहमी असते. सीबीआर प्रसाद या हवाई दलातून निवृत्त झालेल्या 74 वर्षांच्या अधिकाऱ्याने आपल्या आयुष्यातील सर्व मिळकत संरक्षण मंत्रालयाला देणगी म्हणून दिली आहे. ही रक्कम एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्या या कृतीने त्यांनी सगळ्यासमोर आदर्श ठेवला आहे.

प्रसाद यांनी हवाई दलात 9 वर्षे काम केले होते. हवाई दलातून निवृत्त झाल्यावर त्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करत स्वतःचे फार्म सुरू केले. आता त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्व मिळकत संरक्षण मंत्रालयाला दान केली आहे. आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यावर संरक्षण क्षेत्रासाठी काहीतरी करावे अशी इच्छा मनात होती. त्यामुळे आयुष्यातील सर्व मिळकत संरक्षण क्षेत्राला देणगी देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसाद यांनी सांगितले. आयुष्यातील आतापर्यंतची आपली मिळकत एक कोटी 8 लाख रुपये आहे. ती सर्व रक्कम आपण संरक्षण क्षेत्राला दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना या रकमेचा धनादेश दिल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

एवढी मोठी रकम संरक्षण मंत्रालयाला देणगी देण्याच्या तुमच्या निर्णयावर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती, असे विचारल्यावर ते म्हणाले. आपल्या कुटुंबाने यासाठी आनंदाने परवानगी दिली. आपल्या मिळकतीचा दोन टक्के वाटा मुलीला तर एक टक्के वाटा पत्नीला दिला आहे. तर उरलेली 97 टक्के रक्कम संरक्षण मंत्रालयाला देणगी दिली आहे, असे त्यांनी सांगितले. आपण समाजाचे, देशाचे आणि संरक्षण क्षेत्राचे देणे लागतो. या भावनेतून ही मदत केल्याचे त्यांनी सांगितले. हवाई दलात काम केलेली 9 वर्षे आयुष्यातील महत्त्वाची वर्षे असल्याचे त्यांनी सांगितले. एके काळी आपल्याकडे फक्त पाच रुपये होते. मेहनत करून आपण 500 एकर जमीन खरेदी केली. त्यातील पाच एकर पत्नीला दिली आहे. तर 10 एकर मुलीला दिली आहे. त्यामुळे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे सामजिक भान जपत संरक्षण मंत्रालयाला देणगी दिली आहे. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यामुळे आपले हे स्वप्न देशातील तरुणांनी पूर्ण करावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी क्रीडा विद्यापीठ स्थापन केले आहे. त्यातून तरुणांना आणि मुलांना विविध क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या