कारगिल युद्धादरम्यान हिंदुस्थानला विकण्यात आला 30 वर्षे जूना दारुगोळा!

1561

कारगिल युद्धादरम्यानच्या काही गोष्टी माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांनी उघड करत या युद्धानंतर आत्मनिर्भर होण्याचा महत्त्वाचा धडा आपल्याला मिळाल्याचे ते म्हणाले. या युद्धादरम्यान एका देशाने आपल्याला 30 वर्षे जूना दारुगोळा विकला होता. त्याचा सैन्याला काहीच उपयोग झाला नाही. तसेच एका देशाने सॅटेलाईट इमेज देण्यासाठी मोठी रक्कम वसूल केली आणि प्रत्यक्षात तीन वर्षे जुनी इमेज पाठवली. त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. या कठीण परिस्थितीत सहयोगी देश किंवा इतर देशांनी हिंदुस्थानचा फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले.

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांनी युद्धादरम्यान सैन्याचे नेतृत्व केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला हुसकावण्यात आले. चंदीगढमध्ये आयोजित ‘मेक इन इंडिया अॅण्ड नेशन्स सिक्युरिटी’ कार्यक्रमात मलिक यांनी युद्धादरम्यानच्या अनेक गोष्टी सांगितल्या. या युद्धानंतर संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा धडा आपल्याला मिळाला. आपण या क्षेत्रात आत्मनिर्भर होत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे ते म्हणाले. या युद्धादरम्यान युद्धसामग्री आणि शस्त्रे विकणाऱ्या सहयोगी किंवा इतर देशांनी आपला फायदा उचलण्याच्या प्रयत्न केला. युद्धादरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून डेनेल गन विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शस्त्रे देण्याची तयारी दर्शवली. मात्र, शस्त्रे देण्याच्यावेळी सध्या आमच्याकडे शस्त्रे नसून तुम्हाला गरज असल्यास जुनी शस्त्रे पुरवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. युद्धातील दारुगोळ्याची गरज असल्याने एका देशाकडून तो मागवण्यात आला. त्या देशाने आपल्याला 30 वर्षे जूना दारुगोळा विकला. त्या देशाचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. एवढ्या जून्या दारुगोळ्याचा सैन्याला काहीच फायदा झाला नाही, असेही त्यांनी सांगितले. युद्धादरम्यान आपल्याला सॅटेलाइट इमेजची गरज होती. त्यासाठी एका फ्रेमसाठी आपण 36 हजार रुपये मोजले. मात्र, प्रत्यक्षात तीन वर्षे जुन्या इमेज देण्यात आल्या. त्याचा काहीच उपयोग नसल्याचे त्यांनी सांगितले.

या घटना लक्षात घेता युद्धानंतर लष्कराला आणि संरक्षण दलाला परदेशी मदतीवर अवलंबून राहता येणार नाही, हे लक्षात आल्याचे ते म्हणाले. संरक्षण क्षेत्रात देशातील खाजगी कंपन्याना सहभागी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. खाजगी कंपन्यांचा सहभाग वाढल्यास संरक्षण क्षेत्राचा विकास होईल, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या