
एमएस धोनी हा जादूगार आहे. तो कचऱ्याचेदेखील सोन्यात रूपांतर करू शकतो. तो अतिशय संयमी आणि सकारात्मक कर्णधार आहे. प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी एक प्रक्रिया असते आणि धोनीने ही प्रक्रिया आधी हिंदुस्थानी संघासोबत केली असून, आता ही प्रक्रिया तो चेन्नईबरोबर करीत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने व्यक्त केले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या आयपीएल मोसमातदेखील अंतिम सामन्यात सर्वप्रथम धडक मारली आहे. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मॅथ्यू हेडनने धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. हेडन म्हणाला, ‘‘मी त्याच्या नेतृत्वात चेन्नईमध्ये खेळलो असून, त्याच्या नेतृत्व क्षमतेने मला प्रभावित केले आहे. धोनी जादूगार असून, तो कोणत्याही गोष्टींचे सोने करू शकतो. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून सीएसकेची ओळख असून, सीएसकेच्या यशामध्ये धोनीचा सर्वात मोठा वाटा आहे. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने 10व्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. यंदाच्या मोसमात सीएसकेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मात्र, धोनीच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा जादू केली असून, संघाला यश मिळवून दिले आहे.’’