शिंदे-फडणवीसांमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची धमक नाही

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची धमक नाही, अशी टीका काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पराभवाची धास्ती असल्यानेच सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसच्या आढावा बैठकीत सहभागी झालेले पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर निशाणा साधला. शिंदे-फडणवीस सरकार हे जातीयवादी असून त्यांना गाडण्याचा निर्धार काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आल्याचे ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार शिंदे-फडणवीस यांनी पाडल्याने जनतेमध्ये तीव्र संताप असून या सरकारला धडा शिकवण्यासाठी आघाडी करूनच निवडणुका लढवल्या जाव्यात, असा सूर बैठकीत उमटत असल्याचे ते म्हणाले.

बृजभूषण सिंहना तत्काळ अटक करा
महिला कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी केली. बृजभूषण यांच्याविरुद्ध दाखल गुह्यांमध्ये एक गुन्हा तर पोक्सो कायद्यांतर्गत असूनही त्यांना अटक होत नाही आणि जगभर या प्रकरणामुळे देशाची बदनामी होत असल्याचे ते म्हणाले.