काँग्रेसचा ‘गरिबी हटाव’चा खेळ 1971 पासून, राहुल गांधी सर्वाधिक खोटे बोलणारे नेते!

rahul-gandhi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी 23 एप्रिल रोजी देशातील 115 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. रविवारी तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी ‘आज तक’ला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर कडाडून टीका केली.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशातील 20 कोटी गरिबांना न्याय योजनेद्वारे वर्षाला 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली. याबाबत विचारले असता शिवराज सिंह चौहान म्हणाले की, न्याय योजनेमुळे भाजपला नुकसान होणार नाही. राहुल गांधी हे सर्वात जास्त खोटे बोलणारे नेते आहेत. काँग्रेस हा गरिबी हटावचा खेळ 1971 पासून खेळत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

shivraj

मध्यप्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकेल असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली. परंतु काँग्रेसने यावेळी दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. तसेच लोकसभा निवडणूक का लढवली नाही याला उत्तर देताना ते म्हणाले की, राज्यात भाजप सरकारमध्ये नसताना मी निवडणूक लढून दिल्लीत जाईल आणि येथे कार्यकर्त्यांना एकटे लढण्यास ठेऊन जाणे मला पटत नाही. त्यामुळे येथे राहून काँग्रेसविरोधात लढण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.