पुणे – काँग्रेसच्या माजी नगरसेविकेच्या पतीच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीता राजपूत यांचे पती जयंत राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जयंत लालुसिंग राजपूत (वय – 54) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ही घटना 28 ऑक्टोबर 2020 मध्ये डेक्कन परिसरातील कांचनगंगा गल्लीतील चैतन्य अपार्टमेंटमध्ये घडली होती.

राजेंद्र दत्तात्रय मारणे (वय – 45, रा. मोहननगर, धनकवडी), डॉ. विवेक रसिकराज वायसे (वय – 44, रा. बावधन), बापू सुंदर मोरे (वय – 40, रा. सिंहगड रोड), बापूराव विनायक पवार (वय – 34, रा. भेकराईनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी निता जयंत राजपूत (वय – 55, रा. सदाशिव पेठ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये संशयित आरोपींच्या नावाचा उल्लेख आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत आणि आरोपी यांच्यात पैशांची देवाण-घेवाण झाली होती. आरोपी मारणे हे टेम्पोचालक असून मोरे आणि पवार खासगी कंपनीचे रिकव्हरी एजंट आहेत. त्यांनी धमक्या दिल्यामुळे जयंत राजपूत यांनी 28 ऑक्टोबरला कार्यालयातच आत्महत्या केली.

आत्महत्येपुर्वी जयंत यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. तपासादरम्यान आरोपींचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या