शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी नगरसेविका श्रद्धा लांडगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. तसेच भोसरी विधानसभेवर आता शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षावर त्यांनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपमध्ये आता आचारविचार राहिलेला नाही. भाजपवाले आता फक्त सत्ता जिहाद करायला लागलेत. काहीही करा पण सरकार आले पाहिजे. महाराष्ट्र नासला, मेला तरी चालेल, पण राज्य आमचे असले पाहिजे. ही प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी मी शिवसेना म्हणून उभा आहे. त्या शिवसेनेत तुम्ही आज प्रवेश करत आहात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपा आणि संघाचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. सत्ता आल्यानंतर देशात बदल होईल, आपल्या आयुष्यात बदल होईल, हिंदुत्वाचे तेज वाढेल असे त्यांना वाटले होते, परंतु हिंदुत्वाला काळिमा लावण्याचे काम भाजपा करत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपा म्हणजे हिंदुत्व नव्हे. छत्रपती शिवरायांचा, संभाजी महाराजांचा तुम्ही जयजयकार केला. ते संस्कार आपल्यावर आहेत. तेच आपले हिंदुत्व आहे, असे ते लांडगे आणि कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. भाजपचे हिंदुत्व बोगस आहे, आता त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
याप्रसंगी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते. रवी लांडगे यांच्यासह प्रभाकर वाळुंज, अशोक पवार, वैभव दिघे, ज्ञानेश्वर थोरवे, अविनाश मोरे, राजू नेवाळे, नवनाथ मोरे, बाळासो साने, सचिन तापकीर, नानासाहेब वाळके, विजय बोऱ्हाडे, राजू भालेकर, गणेश यादव, लालचंद लांडगे, संतोष लांडगे, नामदेव लांडगे, मारुती लांडगे, शिवराज काटे, आकाश पंद, मनोहर वाघमारे, श्रीहरी लांडे-पाटील, गणेश पंद, भाग्योदय घुले आदी कार्यकर्त्यांनी या वेळी शिवसेनेत प्रवेश केला.
भोसरीत शिवसेनेचाच आमदार निवडून आणायचाय – संजय राऊत
रवी लांडगे यांच्यासह आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांना पाहून आपण भोसरीची विधानसभा जिंकून इथे आलो आहोत अशा प्रकारचे वातावरण आहे, असे याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले. रवी लांडगे म्हणजे भोसरीतील एक धगधगती मशाल आहे आणि त्यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण किती झपाट्याने बदलतेय याचे ज्वलंत उदाहरण आहे, असे ते म्हणाले. आपण योग्य वेळी योग्य पक्षात आला आहात. आपल्याला अजिबात पश्चाताप होणार नाही, असे लांडगे आणि कार्यकर्त्यांना सांगतानाच, भविष्यात आपल्याला महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार आणायचे आहे आणि त्यासाठी भोसरी विधानसभेत शिवसेनेचाच आमदार आपल्याला निवडून आणायचा आहे, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.
शिवसेनाप्रमुखांचा सच्चा शिवसैनिक बनून दाखवेन
रवी लांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या वेळी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली. लांडगे कुटुंब जनसंघापासून काम करत आहे. त्यानंतर भाजप वाढवण्याचे काम केले, परंतु गेल्या दहा वर्षांपासून भाजपकडून भ्रष्टाचार, हुपूमशाही, सत्तेचा गैरवापर सुरू आहे. त्याला कंटाळून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला. भाजपची हुकूमशाही मोडून काढून शिवसेनाप्रमुखांचा सच्चा शिवसैनिक बनून दाखवेन, असे आश्वासन रवी लांडगे यांनी या वेळी दिले.