
दिल्ली उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया शनिवारी तिहार तुरुंगातून आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी घरी पोहोचले. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ते पत्नी आणि कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी त्यांना देण्यात आली.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले सिसोदिया यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी तिहार तुरुंग अधीक्षकांना सिसोदिया यांना त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाण्याचे निर्देश दिले, जिथे त्यांना सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सिसोदिया यांना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. सायंकाळी पाच वाजता त्यांना पुन्हा कारागृहात यावे लागेल.
अबकारी घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने अटक केली होती, तेव्हापासून ते कोठडीत आहेत. 30 मे रोजी उच्च न्यायालयाने त्यांना सीबीआय प्रकरणात जामीन देण्यास नकार दिला होता.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या गुन्ह्यात सिसोदिया यांना 9 मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. पत्नीला भेटण्यासाठी तुरुंगातून बाहेर पडताना सिसोदिया हे मीडियाशी किंवा कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणाशीही बोलणार नाहीत आणि फोन किंवा इंटरनेटही वापरणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.