आर. आर. आबांचे स्मारक ‘लालफितीत’ अडकले

55

प्रकाश कांबळे । सांगली

संपूर्ण राज्याचे ‘आबा’ म्हणून लोकमान्यता पावलेले दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचेच स्मारक ‘लालफिती’त अडकले आहे. तब्बल सव्वादोन वर्षे ही प्रक्रिया सुरू आहे. आता निविदाप्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी येत्या १६ ऑगस्टला ‘आबां’च्या जयंती दिनी तरी स्मारकाच्या कामाचा शुभारंभ होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्यांचे राजकारणातील प्रतिनिधी म्हणून ओळख असणाऱया आर. आर. आबांच्या स्मारकाला जिल्हा प्रशासनाच्या उदासीन काराभारामुळेच विलंब होत झाल्याची चर्चा सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाची उदासीनता, सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार आणि निष्ठावंतांच्या दबावाअभावी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे स्मारक अद्यापि फक्त कागदावर आहे. यासाठी शासनाने पावणेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करूनही तो आजपर्यंत उपयोगात आणण्यात आलेला नाही. आर. आर. पाटील यांचे यथोचित स्मारक व्हावे यासाठी ‘आबा’प्रेमी आजअखेर प्रयत्न करीत आहेत. मात्र, गेली दोन-अडीच वर्षे त्यांना ‘लालफितीचा’ कारभार आडवा येत आहे.

आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनानंतर सांगली जिह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. राजकारणात असूनही स्वच्छ प्रतिमा जपण्यात आर. आर. पाटील अखेरपर्यंत अग्रेसर राहिले. राजकीय क्षेत्रातील नव्या पिढीला ‘आबां’च्या स्मृतीतून नवी प्रेरणा मिळावी, या हेतूने त्यांचे यथोचित स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासनाकडे त्यासाठी ९ कोटी ८६ लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. याला शासनाने १९ ऑक्टोबर २०१६ रोजी मान्यता देऊन निधी मंजूर केला. या निधीतील २ कोटी ८६ लाख रुपये ३१ मार्च २०१७ रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे ‘आबां’च्या स्मारकाला खऱया अर्थाने गती मिळाली. गेले वर्ष-दीड वर्ष स्मारक उभा करण्याच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाला यश आले. शासनाने निधी देऊनही अद्यापि स्मारकाच्या कामाचा श्रीगणेशा झालेला नाही.

दिवंगत आर. आर. पाटील यांचे स्मारक सांगली-मिरज रस्त्यावरील महात्मा गांधी वसतिगृहाच्या आवारात व्हावे यासाठी सर्वांनी मान्यता दिली. त्याचा आराखडाही तयार झाला. या आराखडय़ात संग्रहालय, ग्रंथालय, सभागृह, कलादालनाचा समावेश करण्यात आला आहे. कलादालनामध्ये आबांच्या कारकीर्दीतील महत्त्वपूर्ण छायाचित्रांचा समावेश असणार आहे. गेल्या वर्षी ‘आबां’च्या स्मृती दिनी स्मारकाच्या कामाचा शुभारंभ करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते. मात्र, त्यावेळी निवडणुकांची आचारसंहिता होती. आचारसंहितेनंतर या कामाचा शुभारंभ करण्याची घोषणा तत्कालिन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केली. मात्र, अडीच वर्षे होत आले तरी या कामाचा शुभारंभ झालेला नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे काम सुरू करण्याच्या सूचना देऊनही अडीच वर्षे होत आली तरी स्मारकाच्या कामाला अद्यापि मुहूर्त सापडलेला नाही. जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळेच आर. आर. आबांच्या स्मारकाचे काम रेंगाळले आहे. याबाबत संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला असता सध्या या कामाची बांधकाम विभाग, मिरज यांच्या वतीने निविदा काढण्यात आली आहे. निविदा दाखल होताच ज्या ठेकेदाराला काम मिळेल त्याच्याकडून तातडीने काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या १६ ऑगस्ट रोजी आबांच्या जयंती दिनी या स्मारकाचा शुभारंभ होणार का? याबाबत आजही साशंकता आहे. आबाप्रेमी कार्यकर्त्यांनी जनरेटय़ाच्या माध्यमातून ‘आबां’च्या स्मारकाच्या कामाला गती देण्याची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या