राजकारणातील सर्वांचा ‘जवळचा मित्र’ हरपला, अरुण जेटली यांचे निधन

412

 भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांचे आज निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण जेटली यांच्या निधनामुळे देशाने एक विद्वान, धुरंधर नेता गमावला आहे. राजकारणातील सर्व पक्षांमधील अनेकांचा जिवलग मित्र हरपला आहे. जेटली यांच्या निधनाने अवघा देश शोकसागरात बुडाला असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्टला निधन झाले. स्वराज यांच्या निधनाच्या धक्क्यातून देश सावरलेला नाही तोच आज शनिवारी देशवासीयांना अरुण जेटली यांच्या निधनामुळे आणखी एक धक्का बसला आहे. जेटली गेले काही महिने आजारी होते. त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्र्ाक्रिया करण्यात आली होती. मोदी सरकार-1मध्ये समर्थपणे त्यांनी अर्थ मंत्रीपद सांभाळले होते. काही काळ संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता. केंद्र सरकारच्या अनेक समित्यांची धुरा त्यांच्या खांद्यावर होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेटली यांनी केंद्रात पुन्हा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारमधील मंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे 9 ऑगस्टला जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांना त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. आज दुपारी 12.07 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. जेटली यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.

राष्ट्रपतींसह अनेक नेत्यांकडून अंत्यदर्शन

अरुण जेटली यांचे पार्थिव दिल्लीतील कैलास कॉलनी येथील निवासस्थानी आणण्यात आले. या वेळी अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजपसह विविध पक्षांच्या नेत्यांची गर्दी उसळली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह भाजप अध्यक्ष, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन, जितेंद्र सिंह, एस. जयशंकर, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले.

आज अंत्यसंस्कार

अरुण जेटली यांच्या पार्थिवावर उद्या, रविवारी सायंकाळी 4 वाजता निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, असे भाजप नेते सुधांशू मित्तल यांनी सांगितले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कैलाश कॉलनी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. उद्या भाजपच्या मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. भाजपच्या मुख्यालयातून मग सायंकाळी 4 वाजता निगमबोध घाटावर जेटली यांच्या पार्थिवावर  अंत्यसंस्कार केले जातील, असेही मित्तल यांनी पुढे स्पष्ट केले.

चांगला मित्र गमावला

माझा चांगला मित्र मी गमावला. राजकारणातील सर्वच मुद्दय़ांवर त्यांची पकड होती. अनेक सुखद आठवणी मागे ठेवून ते निघून गेले. आम्हाला ते नेहमी आठवत राहतील. भाजप आणि अरुण जेटली यांच्यात एक कधीच न तुटणारे बंधन होते. एक तेजतर्रार विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी आपल्या लोकशाहीचे रक्षण सर्वांच्या पुढे राहत केले होते. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आपली प्रतिक्रिया द्या