हिंदुस्थानला फुटबॉलमध्ये ‘सुवर्ण’युग दाखवणारे पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते चुन्नी गोस्वामी यांचे निधन

1398

हिंदुस्थानला फुटबॉलमध्ये ‘सुवर्ण’युग दाखवणारे माजी कर्णधार चुन्नी गोस्वामी यांचे निधन आज गुरुवारी निधन झाले. वयाच्या 82 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोस्वामी यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. ते दीर्घ काळापासून आजारी होते. आज सकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

1962 ला झालेल्या आशियाई खेळात हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाने सुवर्णपदक जिंकले होते, या संघाचे गोस्वामी कर्णधार होते. तसेच बंगाल क्रिकेट संघाकडून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटही खेळले होते. हिंदुस्थान सरकारने या अष्टपैलू खेळाडूला पद्मश्री आणि क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला होता.

ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
गोस्वामी हे दीर्घ काळापासून आजारी होते. गुरुवारी सकाळी त्यांची तब्येत जास्तच खालावल्याने त्यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

अष्टपैलू खेळाडू
1962 ला आशिया खेळात हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाने सुवर्णपदक जिंकले. 1964 ला झालेल्या स्पर्धेत हिंदूदुस्थानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. या दोन्ही वेळेस गोस्वामी कर्णधार होते. कोलकाताचा प्रसिध्द फुटबॉल क्लब मोहन बागानचे आजीवन सदस्य राहिले. ते फक्त फुटबॉलपटूच नाही तर उत्तम क्रिकेट खेळाडू देखील होते. तसेच ते जबरदस्त हॉकी खेळाडूही होते.

27 व्या वर्षी घेतला संन्यास
गोस्वामी यांनी 1957 ला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. फक्त 27 व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. मात्र मोहन बागानकडून ते खेळत राहिले.

वेस्ट इंडिजचा पराभव
गोस्वामी एक उत्तम क्रिकेट खेळाडूही होते..1966 ला वेस्ट इंडिजचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी हनुमंत सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक संघ वेस्ट इंडिजशी सराव लढत खेळला होता. इंदूरमध्ये झालेल्या या लढतीत गँरी सोबर्स यांच्या संघाचा 8 विकेट्सने पराभव झाला होता. या लढतीत गोस्वामी यांनी 8 बळी घेतले होते. तसेच 1971-72 ला ते बंगाल संघाचे कर्णधार राहिले आणि संघाला रणजी स्पर्धेत अंतीम फेरीपर्यंत पोहोचवले. अंतिम फेरीत त्यांना मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या