उदयनराजेंनी मुस्लिमांची मागितली माफी, भाजप जिल्हाध्यक्षांना गर्भीत इशारा!

4621
udayanraje-bhosale

माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा भेटीगाठी सुरु केल्या आहेत. उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच मुस्लिम समाजाची जाहीर माफी मागितली आहे. कराड शहरात येऊन उदयनराजेंनी मुस्लिम समाजाची माफी मागितली. लोकसभा निवडणुकीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कराडमधील प्रचारसभेत मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे भोसले यांनी माफी मागितली आहे. प्रचारसभेवेळी मी उपस्थित असतो, तर भाजप जिल्हाध्यक्षाला खाली खेचले असते, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले.

उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी कराडमध्ये मुस्लिम समाजाचा मेळावा घेतला. यावेळी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नियोजन समितीचे सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम समितीच्या सभापती हणमंत पवार, विजयसिंह यादव, नगरसेवक बाळासाहेब यादव आदीउपस्थित होते. उदयनराजे भोसले यांनी कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी गुरुवारी केली. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची सांगता सभा कराडमध्ये झाली होती. यावेळी ‘भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मते देऊ नका, भाजपला द्या’, असे आवाहन करताना मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

उदयनराजे म्हणाले, माफी मागताना सुद्धा लाज वाटते. जे मी केले नाही, दुसऱ्याने केले, तरीही मी माफी मागतो. त्यांचा मतितार्थ एवढाच की समाज एकत्र राहायला नको असा होता. भाजप जिल्हाध्यक्ष माझ्या प्रचारात नव्हते, सांगता सभेत त्यांनी माझ्या प्रचारात येऊन सर्व कामावार विरजण टाकले. मी त्या सभेत असतो तर सभेतून खाली खेचले असते असे ही उदयनराजे म्हणाले. मी फक्त सॉरी म्हणायला आलोय, जे मी केले नाही, जे कृत्य मी केले नाही. त्यासाठी सॉरी म्हणायला आलो आहे. माझी तुम्हाला शपथ आहे, असा कोणी करणारा असेल, त्याला खाली खेचा, ठेचा पण माझ्यावरती त्याचे गालबोट नको, असे उदयनराजे म्हणाले. राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांचा नावलौकिक वाढेल असे काम करावे, असेही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ‘सातारा जिल्ह्याला आमची गरज असती तर आमची घसरगुंडी झाली नसती’, असे माजी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या