जेतेपदासाठी टीम इंडियाच फेव्हरिट; माजी पाकिस्तानी कर्णधार इंझमामचे मत

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने कोणता संघ जेतेपद पटकावले याचा नेम नसतो. पण यंदाच्या  टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच मला सर्वात बलाढय़ संघ वाटतो. हिंदुस्थानी संघच यंदा जेतेपदासाठी टॉप फेव्हरिट आहे असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज इंझमाम उल हक याने व्यक्त केले आहे. परिस्थितीनुसार खेळण्यात हिंदुस्थानी क्रिकेटपटू माहीर आहेत, असेही तो म्हणाला.

हिंदुस्थानपाकिस्तान लढत अंतिम लढतीसारखीच

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघांत 24 ऑक्टोबरला खेळवली जाणारी सुपर-12 फेरीतील सलामीची लढत ही आम्हाला अंतिम लढतीसारखीच वाटते. कारण सर्व जगाचे लक्ष या लढतीकडे असणार आहे, असे सांगून इंझमाम म्हणाला, 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही या दोन संघांनी एकमेकांत सलामीची आणि अंतिम लढत खेळून स्पर्धेचा समारोप केला होता. निकाल काहीही येवो, पण उभय देशाच्या क्रिकेट शौकिनांत हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीबाबत प्रचंड कुतूहल व अपेक्षा असतात हे मात्र खरे आहे, असे शेवटी इंझमाम म्हणाला.