आलोक वर्मांविरुद्ध पुरावेच नाहीत, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी केली पोलखोल

22

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आलोक वर्मा यांच्या बचावासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. पटनायक हे आज धावून आले. कथित भ्रष्टाचाराच्या केंद्रीय दक्षता आयोगाने केलेल्या चौकशीत वर्मा यांच्याविरोधात कोणताही पुरावा आढळलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ती चौकशी पटनायक यांच्याच देखरेखीखाली पार पडली असल्याने त्यांनी आलोक वर्मांच्या संबंधात व्यक्त केलेल्या मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आलोक वर्मा यांच्या प्रकरणात केंद्रीय दक्षता आयोगाने काढलेले निष्कर्ष हे माझे नाहीत असे स्पष्ट करून पटनायक म्हणाले की, वर्मा यांच्या विरोधातील चौकशी ही पूर्णपणे सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या तक्रारीवर आधारित होती. तसेच वर्मा यांना सीबीआयच्या प्रमुख पदावरून हटवण्याचा निर्णय पंतप्रधानांच्या अधिपत्याखालील समितीने अतिशय घाईने घेतला आहे.

पिंजऱयातला पोपट आकाशात कसा झेपावणार?
राजकारणी लोक ‘सीबीआय’ला पिंजऱयातील पोपट असे म्हणत आणि मानत आले आहेत असे सांगतानाच पोपटाला कोंडून ठेवले तर आकाशात झेपावणार कसा, असा सवाल माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी आज केला. देशाची सर्वोच्च तपास संस्था असलेली ‘सीबीआय’ स्वतंत्र असलीच पाहिजे. राजकीय कटकारस्थानांपासून तिला मुक्त करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या