श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर याच्या कार्यकाळाला सुरुवात झाली. टी-20 मध्ये टीम इंडिया वरचढ ठरली, तर वनडे मालिकेमध्ये श्रीलंकेने बाजी मारली. मात्र आता टीम इंडियाची पुढची मालिका बांगलादेशविरुद्ध होणार आहे. मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माजी गोलंदाजाची टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून BCCI ने निवड केली आहे.
BCCI ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केल याची टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. मोर्ने मॉर्केल मागील वर्षी हिंदुस्थानात झालेल्या विश्व चषकामध्ये पाकिस्तानचा प्रशिक्षक होता. त्याचबरोबर IPL मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघासोबत काम करण्याचा अनुभव मोर्केलच्या गाठीशी आहे. त्याचबरोबर गौतम गंभीर सुद्धा या काळात दोन वर्ष लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मेंटोर होता. त्यामुळेच गौतमने मोर्ने मोर्केलची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करावी अशी मागणी बीसीसीआयकडे केली होती. गौतम गंभीरच्या मागणीला बीसीसीआयने सकारात्मक प्रतिसाद दिला असं म्हणावे लागेल. मोर्नी मोर्केलच्या समावेशामुळे टीम इंडियाचे गोलंदाजी आक्रमण आता अधिक मजबूत होणार आहे. मोर्नी मोर्केलने 2006 ते 2018 या काळात 117 वनडे, 86 कसोटी आणि 44 टी20 सामने खेळले आहेत.