धक्कादायक! माजी विधानसभा अध्यक्ष सरकारी फर्निचर, किंमती सामान घरी घेऊन गेले

1366

आंध्र प्रदेश विधानसभेच्या माजी अध्यक्षांनी ते पदावर असताना ज्या कार्यालयात बसायचे, त्या कार्यालयातील किंमती फर्निचर आणि मौल्यवान वस्तू घरी घेऊन गेल्याचं उघड झालं आहे. कोडेला शिवप्रसाद राव असं या माजी अध्यक्षांचे नाव आहे. राव यांच्या घरी चोरी झाली होती आणि या चोरांनी ज्या वस्तू सरकारी कार्यालयातून आणल्या होत्या त्यातील कॉम्प्युटर चोरले होते. आपण पकडले जाऊ या भीतीने या चोरांनी हे कॉम्प्युटर रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. या चोरीमुळे राव यांनी सरकारी कार्यालयातील वस्तू उचलून घरी आणल्याचे उघड झाले.

राव यांनी आपण या वस्तू सरकारी कार्यालयातून उचलून आणल्याचं इंडीयन एक्सप्रेसशी बोलताना कबूल केलं आहे. त्यांनी ज्या वस्तू उचलून आणल्या त्यामध्ये निजामाच्या काळातील मोठं टेबल,बर्मा टीक लाकडापासून बनवलेल्या उंची खुर्च्या, मोराच्या आकाराच्या अभ्यागतांसाठीच्या 14 खुर्च्या,सेंटर टेबल, खासगी दालनातील तीन माणसे बसू शकतील असा सोफा, स्प्लिट एसी, टॉवर एसी , कॉ्म्प्युटर, 117 प्लॅस्टीकच्या खुर्च्या यांचा समावेश आहे. आपण या सगळ्या गोष्टी चोरांपासून वाचवण्यासाठी तसेच खराब होऊ नयेत यासाठी आपल्या घरी आणल्याचा दावा केला आहे. मात्र यातील काही किंमती वस्तू राव यांच्या मुलाच्या बाईक ठेवण्यासाठीच्या गॅरेजमध्ये ठेवलेल्या दिसून आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा दावा निखालस खोटा असल्याचा आरोप सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. राव यांनी या वस्तू चोरल्याचा गंभीर आरोपही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने केला आहे. या वस्तू राव यांनी घरी नेल्याची बाब उजेडात आल्यानंतर विधानसभेचे मुख्य सुरक्षा अधिकारी गणेश बाबू यांची तत्काळ बदली करण्यात आली आहे.

जून 2014 रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन करण्यात आले आणि तेलंगाणा राज्याची निर्मिती करण्यात आली. या दोन्ही राज्यांची राजधानी ही हैदराबाद हीच होती. आंध्र प्रदेशने त्यांचे नवे विधीमंडळ अमरावती इथे उभारण्याचा निर्णय घेतला होता. आंध्र प्रदेशचे माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांनी दावा केला आहे की अमरावती इथे विधीमंडळाचे काम पूर्ण होईपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी घरी ठेवण्याचं ठरवलं होतं. काम पूर्ण होताच मी त्या वस्तू परत करणार होतो.  आपण याबाबतची माहिती 7 जून रोजी विधीमंडळाच्या सचिवांना पत्राद्वारे दिली होती असं राव यांचं म्हणणं आहे. जर सरकारने किंमत सांगितली तर मी या सगळ्या वस्तू विकत घ्यायलाही तयार आहोत असंही राव यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या