मी वेगळी, छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून आनंद

203

>>मंगला देशमुख, निवृत्त शिक्षिका

मी सामान्य मध्यमवर्गीय निवृत्त शिक्षिका आहे. घर, नोकरी आणि नातीगोती यांच्याभोवती गेली ३५ वर्षे तारेवरची कसरत करत आहे. मी मनाची सच्ची आहे. आत एक बाहेर एक असं काही नसतं.

गेली अनेक वर्षे अशीच या चक्रात अडकले आहे. आता कुठे मोकळा श्वास घ्यावयास लागले आहे. ‘एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे’ या उक्तीप्रमाणे सर्व काही भोगून झाले आहे. आता सुखदुःखाच्या पलीकडे गेले आहे. ना सुखाने हुरळून जात ना दुःखाने उन्मळून पडत. याचे कारण आहे, अध्यात्माविषयीची ओढ, गुरूंचे मिळालेले पाठबळ आणि मोठय़ांचे आशीर्वाद. यामुळे आता प्रत्येक क्षणाचा आनंद घेते. छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून आनंद शोधते. मुख्य म्हणजे वर्तमानकाळात जगते. भजन, कीर्तनाची आवड जोपासून हार्मोनियम आणि गाणे शिकतेय. निरोगी राहण्यासाठी योगासने, फिरणे यात वेळ घालवते. महिला मंडळे, बचत गट चालवते. दासबोधाचा अभ्यास करते. वेगवेगळय़ा ग्रुपमध्ये सहभागी होते. नातवंडात खेळून बालपण अनुभवते. सभा-संमेलने गाजविते. नातेवाईकांमध्ये प्रिय आहे. मुख्य म्हणजे सकारात्मक विचारधारा ठेवते.

मला निसर्गात रमायला खूप आवडते. झाडे, पाने, फुले, शेती यांची आवड आहे. भविष्यात तेच स्वप्न आहे. ते पुरे होईलच ही आशा आहे. आपण ज्या समाजात वाढलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. त्यासाठी समाजातील विविध गटांमध्ये कार्यरत आहे. मराठा समाज उन्नती मंडळ, पनवेल येथे कमिटी सभासद म्हणून सहभाग उचलते. गव्हाण-कोपर येथे महिला मंडळाचे अध्यक्षपद सांभाळते. ‘बिना सहकार नही उद्धार’ याप्रमाणे घरातील मोठय़ांचे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे पूर्ण सहकार्य मला लाभते. त्यामुळे मन तृप्त आणि समाधानी आहे.

प्रत्येकीचं स्वतःचं असं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱयांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमच्या स्वतःतील वेगळेपण फोटोसहीत आम्हालाही कळवा. वेगळ्या वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता : श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या