‘26/11’ नंतर अमेरिकेसह संपूर्ण जगाचा दबाव होता म्हणून पाकवर हल्ला केला नाही!

‘मुंबईवरील ‘26/11’ च्या हल्ल्याचा बदला घेण्याचा विचार होता, पण अमेरिकेसह संपूर्ण जगाकडून तीव्र दबाव आल्याने आम्ही पाकिस्तानवर हल्ला केला नाही,’ असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम यांनी हा गौप्यस्फोट केला. मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांतच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राइस हिंदुस्थान दौऱ्यावर आल्या होत्या. दोन ते तीन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची व माझी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी, ‘या हल्ल्याला काही प्रतिक्रिया देऊ नका,’ अशी विनंती केली होती. आम्ही त्यांना कुठलाही शब्द दिला नाही. हा निर्णय सरकारचा असेल, इतकेच सांगितले. ‘युद्ध सुरू करू नका’, असे अन्य काही देशांनीही आम्हाला सुचवले होते.