‘किल्ला विकणे आहे’ बॅनरने मालवणात खळबळ

37

सामना ऑनलाईन, मालवण

‘किल्ला विकणे आहे’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्याने मालवण शहरात सोमवारी सकाळी खळबळ उडाली. बसस्थानक, तारकर्ली नाका व म्हाडगुत फोटो स्टुडिओ या तीन ठिकाणी लावलेल्या बॅनर्सची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस प्रशासनाने हे बॅनर जप्त केले असून बॅनर लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक नियुक्त केले आहे.

सोमवारी सकाळी दिसून आलेले हे बॅनर रविवारी रात्री लावण्यात आले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात आली. मात्र कोणी व कोणत्या उद्देशाने हे बॅनर लावले याची चर्चा दिवसभर मालवण शहरात सुरू होती. तर पोलीस पथक बॅनर लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेत होते.

किल्लेप्रेमी संतप्त; पोलिसांनी बॅनर केले जप्त
दरम्यान, शहरातील किल्लेप्रेमी, किल्ले प्रेरणोत्सव समिती आणि वायरी ग्रामपंचायत यांच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी बॅनरबाबत निषेध नोंदवला आहे. तर प्रेरणोत्सव समितीच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शहरात लावण्यात आलेल्या बॅनरबाबत सिंधुदुर्ग किल्ले रहिवाशी,होडी वाहतूक सेवा, काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी, प्रेरणोत्सव समिती यांच्या वतीने घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. प्रेरणोत्सव समितीच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. शहरातील सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून बॅनर लावणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात यावा. बॅनरच्या प्रिंटिंग ठिकाणांचीही माहिती घ्यावी. महाराजांच्या किल्ल्याचा अपमान करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

बॅनरचा मजकूर
शहरात तीन ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर रविवारी रात्री लाइट नसताना लावले गेल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर बॅनरमध्ये ‘किल्ला विकणे आहे’ या ठळक मजकुरासह ’उसनी प्रेरणा समिती व अन्य असा उल्लेख होता. बॅनरवर किल्ले सिंधुदुर्गचा फोटो होता. मात्र ‘सिंधुदुर्ग किल्ला’ असा उल्लेख नव्हता. त्यामुळे बॅनर लावणाऱ्यांचा रोष प्रेरणोत्सव समितीच्या रोखाने होता का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

जनआंदोलन छेडावे लागेल
बॅनर लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडावे लागेल. मालवणातील नागरिक व सर्व सेवाभावी संस्था व किल्लेप्रेमी यांना सोबत घेतले जाईल, अशा भावना मालवण नगरपालिका येथे आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवक, प्रेरणोत्सव समिती यांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. यावेळी समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, विजय केनवडेकर, जोती तोरस्कर, हेमंत वलकर, भाऊ सामंत, नगरसेवक गणेश कुशे, पंकज सादये, यतीन खोत, पूजा सरकारे यासह अन्य उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या