उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बुरे दिन, ४५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाल्याचा मोठा गाजावाजा सुरू असला तरी प्रत्यक्षात मात्र बऱ्याचशा भागात भाजपला बुरे दिनही बघावे लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयी उमेदवारांपेक्षा डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. भाजपचे २,३६६ उमेदवार विजयी झाले असून ३,६५६ उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त करण्यात आले आहेत. ही संख्या इतर पक्षातील डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांच्या संख्येपेक्षाही अधिक आहे. निवडणूक विश्लेषकांच्यामते भाजपला सर्व जागांवर मिळून ३०.८ टक्केच विजय मिळाला आहे. नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपला अवघे ११.१ टक्के मत मिळाले आहेत.

विशेष म्हणजे या निवडणूकीत भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले होते. १२,६४४ जागांपैकी ८,०३८ जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केले होते. यातील अर्ध्या जागांवर भाजप उमेदवारांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. नगर पंचायत सदस्य निवडणूकीत भाजपच्या ६६४ उमेदवारांना विजय मिळाला. तर हरलेल्यांची संख्या १,४६२ एवढी आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात महापौरच्या एकूण १६ जागांवर १४ भाजपने आणि दोन जागांवर बसपाने कब्जा केला होता. मेरठ आणि अलीगढच्या महापौरपदी बसपाचा उमेदवार निवडून आला. तर अयोध्या-फैजाबाद नगर पालिकेच्या महापौरपदावर भाजपचे ऋषिकेश जयस्वाल यांनी सपाच्या गुलशन बिंदू यांना ३६०१ मतांनी पराभूत केले होते.

वाराणसी नगर पालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार मृदृला यांनी कॉंग्रेसच्या शालिनी यांचा ७८,८४३ मतांनी पराजय केला होता. लखनौमध्ये यावेळी इतिहास रचला गेला. संयुक्ता भाटीया लखनौच्या पहिल्या महिला महापौर झाल्या. तर कानपूर येथे प्रनिला पांडेय जिंकून आल्या. गाझियाबादमध्ये भाजपच्या आशा शर्मा यांनी विरोधकांना धूळ चारली होती.

सहारनपूर नगर पालिकेच्या महापौर पदावर भाजपचे उमेदवार संजीव वालिया यांनी बसपाच्या फजल उर्रहमान यांचा दोन हजार मतांनी पराभव केला. मुरादाबाद नगर पालिका महापौर पदाचे भाजप उमेदवार विनोद अग्रवाल यांनी कॉंग्रेसचे मोहम्मद रिझवान कुरैशी यांना २१ हजार ६३५ मतांनी पराभव केला.

आपली प्रतिक्रिया द्या