आठ ड्रग्ज माफियांविरोधात साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र, अडीच हजार कोटींचे ड्रग्ज प्रकरण

नालासोपारा, अंबरनाथ आणि गुजरातमध्ये धडक कारवाई करीत जवळपास अडीच हजार कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करून आठ ड्रग्ज माफियांना अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) अटक केली होती. याप्रकरणी एएनसीने आठ जणांविरोधात दोषारोपपत्र विशेष एनडीपीएस कोर्टात दाखल केले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अमली पदार्थविरोधी कक्षाने नालासोपारा येथे राहणाऱया प्रेमप्रकाश सिंग याला पकडून त्याच्याकडून कोटय़वधी किमतीचा एमडी साठा हस्तगत केला होता. त्यानंतर सिंग अंबरनाथ येथील ज्या पंपनीत हा एमडी बनवत होता तेथे छापा टाकून व्यवस्थापकाला पकडले व तेथून 90 लाखांचा एमडी जप्त केला होता. त्यानंतर गुजरातमधील अंकलेश्वर एमआयडीसी येथील एका कारखान्यावर कारवाई करत कोटय़वधीचा एमडी साठा जप्त केला होता. अशा प्रकारे पोलिसांनी याप्रकरणी आठ ड्रग्ज माफियांना बेडय़ा ठोकून दोन हजार 435 कोटी रुपये किमतीचा एक हजार 218 किलो एमडीचा साठा जप्त केला होता. इतक्या मोठय़ा कारवाईनंतर पोलिसांनी प्रेमप्रकाश सिंग व अन्य सात आरोपींविरोधात विशेष एनडीपीएस कोर्टात चार हजार 818 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.