दिल्ली डायरी – चार बॅगा आणि मी…

14

>> निलेश कुलकर्णी ([email protected])

उत्तर प्रदेशात अनपेक्षितपणे घवघवीत यश मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास चांगलाच दुणावल्याचे दिसून येत आहे. एखाद्या कडक मास्तरांनी संपूर्ण वर्ग फैलावर घ्यावा अशा पद्धतीने मोदींनी भाजपच्या खासदारांना कडक शब्दांत जणू ‘छडी’च मारली. संसदेतील ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ हा मोदी सरकारचा नेहमीच ‘वीक पॉइंट’ राहिला आहे. यापूर्वीचे संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू विरोधकांना केवळ टोले मारणे, टिप्पण्या करणे यातच माहीर असल्याने संसदेत सरकारची मोठी गोची व्हायची. नंतर व्यंकय्यांची उचलबांगडी करून अनंतकुमारांना संसदीय कामकाजमंत्रीपद देण्यात आले. त्यांच्या जोडीला मुख्तार अब्बास नक्वी आणि एस. एस. अहलुवालिया यांची कुमक देण्यात आली तर लोकसभेत राकेश सिंग यांना प्रतोद नेमण्यात आले. मात्र ‘क्वेश्चन अवर इज ओव्हर’ असे सभापतींनी म्हणताच ‘मोदी लाटे’त निवडून आलेले भाजप खासदार थेट सेंट्रल हॉलचा किंवा बाहेरच्या हॉटेल्सचा मार्ग पकडून लंचसह गप्पांचा फड रंगवायचे. साहजिकच सभागृहात भाजप खासदारांची संख्या कमी होऊन नेहमीच राजकीय अडचण व्हायची.

अनंतकुमारांनी अनंतवेळा विनंती करूनही भाजप खासदारांच्या वर्तनात काही फरक पडत नव्हता. त्यामुळे आता संधी मिळताच मोदींनी कडक शब्दांत त्यांची कानउघाडणी केली. ‘तुम्ही आहात कोण?, स्वतःला काय समजता?, लोकांनी तुम्हाला सेंट्रल हॉलमध्ये बसून चकाट्या पिटण्यासाठी निवडून दिलेले नाही. माझे काही नाही. माझे सगळे कोट आणि कपडे मिळून दोन-चार बॅग सामान होईल. ते गुंडाळून कधीही निघून जायची माझी तयारी आहे, मात्र मग तुमचे काय,’ असा प्रश्न त्यांनी खासदारांना केल्यानंतर शाळेच्या वर्गात पसरते तशी शांतता पसरली. मोदी गुरुजींच्या कडक भाषेचा परिणाम दुसऱ्या दिवशीपासून दोन्ही सभागृहांत दिसून आला. इच्छा नसताना व काय चालले आहे हे फारसे समजत नसतानाही भाजप खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याची ‘शिक्षा’ सहन करावी लागली ती अशी…!

आपली प्रतिक्रिया द्या