आश्रम शाळेतून बेपत्ता झालेल्या मुलांनी गाठले पंढरपूर

सामना प्रतिनिधी । बीड

धारुर तालुक्यातील थेटेगव्हाण (कांदेवाडी) येथील शासकीय आश्रम शाळेतून रविवारी बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन मुलांचा अखेर दिंद्रुड पोलीस आणि वस्तीगृह प्रशासनाला शोध लागला आहे. पळून गेलेल्यापैकीच एका मुलाचे पालक ऊसतोडणीचे काम करत असून सध्या ते पंढरपूर तालुक्यातील रोपाळा या गावी वास्तव्यास आहेत. आई-वडिलांना भेटण्यासाठी वस्तीगृहातून रविवारी दुपारी हे चौघे पंढरपुरला पोहचल्याची माहिती समोर आली असून माहिती मिळताच पोलिसांसह वस्तीगृह प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी पंढरपुरच्या रोहाळा गावातून सोबत घेत परत वस्तीगृहात आणले. दिंद्रुड पोलिसांनी चौघांचेही जवाब नोंदवले. दरम्यान मुलांचा शोध लागल्याने आश्रम शाळेतील शिक्षकांनी सुटकेचा निश्वास घेतला.

अमोल सुदर्शन बडे, दत्ता शिवाजी, विशाल वाल्मिक गांगुर्डे, बळीराम नवनाथ हटकर अशी बेपत्ता झालेल्या चार मुलांची नावे आहेत. धारुर तालुक्यातील थेटेगव्हाण (कांदेवाडी) येथक्षल शासकीय आश्रम शाळेत ही मुले शिक्षण घेत असून या ठिकाणीच ते वस्तीगृहात वास्तव्याला होती. रविवार दि. १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ही मुले वस्तीगृहाच्या कंपाऊंडवरुन उडी मारुन बेपत्ता झाली होती. दरम्यान हा प्रकार वस्तीगृह अधीक्षक सुभाष सुर्यवंशी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दिंद्रुड पोलिसात तक्रार नोंदवली. पोलीस नाईक वनवे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला. असे असतांनाच मंगळवारी याच वस्तीगृहातील एका विद्यार्थाच्या मोबाईलवर पळून गेलेल्या एका मुलाने फोन करत आम्ही रोपाळा ( ता.पंढरपुर) येथे आल्याची माहिती दिली. चाणाक्ष विद्याथ्र्याने हा प्रकार वस्तीगृह अधिक्षक सुभाष सुर्यवंशी यांना सांगितला.त्यानंतर सुर्यवंशी यांच्यासह प्राथमिक शिक्षक विशाल दोरगे, चौकीदार युवराज चव्हाण हे तिघे जण बुधवारी सकाळीच पोलिसांना या बाबतची कल्पना देत वाहनातून थेट पंढरपुरच्या रोपाळा गावी दाखल झाले. तिथे चारही मुले आढळून आली. मुलांच्या पालकांना सर्व प्रकार लक्षात आणून देत शिक्षकांनी त्यांना दिंद्रुड पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी सर्व मुलांचे जवाब नोंदवले. यातील तिघांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले तर बळीराम हटकर हा वस्तीगृहात परतला आहे.

मित्राला करमेना म्हणून गाठले पंढरपूर
वस्तीगृहात शिकणारा बळीराम नवनाथ हटकर या विद्यार्थ्याचे तिथे मन लागत नव्हते. त्यामुळे त्याने याबाबत त्याच्या इतर तीन मित्रांना सांगितले. याचवेळी चौघांनीही पळून जाण्याची युक्ती लढवली अन थेट पंढरपुर गाठले.

आगोदर पायी चालले नतर वाहनाने केला प्रवास
वस्तीगृहातून पळून आलेले हे चारही मुले रविवारी दि. १८ रोजी पायी दिंद्रुडला येत नंतर वाहनाने तेलगावला पोहचले. तेथून चालत चालत त्यांनी धारुर गाठले. तिथे दत्ता फुलमाळी याचे आधारकार्डच्या आधारे एका ग्राहक सेवा केंद्रातून त्याच्या बँक खात्यातून ३ हजार रुपये विड्रॉल केले. नंतर याच पैशातून तिकीट काढून वाहनाने चौघेही पंढरपूर तालुक्यातील रोपाळा येथे पोहचले.

आपली प्रतिक्रिया द्या