धोनी तुस्सी ग्रेट हो! 2019 मध्ये 4 अर्धशतकांसह 150 च्या सरासरीने धावा

28

सामना ऑनलाईन । मुंबई

‘धोनीला विश्वचषकामध्ये स्थान देण्यात येऊ नये… धोनी आता थकलाय त्याने आता निवृत्त व्हावे… धोनीने नव्या खेळाडूंना संधी द्यावी… किती स्लो खेळतोय यार…’, अशा प्रतिक्रिया काही महिन्यांपूर्वी हिंदुस्थानचा माजी कर्णधार आणि फिनिशर धोनीबाबत उमटत होत्या. याला कारण म्हणजे त्याचा 2018 मध्ये खराब परफॉर्मन्स. धोनीने 2018 मध्ये 13 डावात 25 च्या सरासरीने फक्त 275 धावा केल्या होत्या. त्यावेळी धोनी ऐवजी निदास ट्रॉफीमध्ये अशक्यप्राय विजय मिळवून देणारा दिनेश कार्तिक आणि ताज्या दमाचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात यावी अशी मागणी सुरू झाली होती. परंतु कर्णधार विराट आणि संघ प्रशासन धोनीच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिले. आणि आज धोनी 2019 मध्ये खोऱ्याने धावा ओढत आहे. विश्वचषकापूर्वी पुन्हा एकदा धोनीचा खेळ बहरला असल्याने हिंदुस्थानचे पारडे नक्कीच जड झाले आहे.

धोनी संघामध्ये फक्त फलंदाज, यष्टीरक्षक म्हणून उपस्थित नसतो, तर तो कोहलीचा मार्गदर्शक म्हणूनही उभा असतो. बऱ्याचदा डीआरएस घेताना देखील विराट गोलंदाज डीआरएस घ्या म्हणत असला तरी धोनीचा सल्ला घेतो आणि आजपर्यंत त्याचा हा सल्ला नेहमीच योग्य राहिल्याचे आपण पाहिले आहे. 2018 हे वर्ष खराब गेल्यानंतर धोनीने 2019 मध्ये दणदणीत खेळ केला आहे. ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानने मिळवलेल्या ऐतिहासिक मालिका विजयात धोनी चमकला. या मालिकेत धोनीने 51, नाबाद 55 आणि नाबाद 87 धावांसह एकून 193 धावा चोपल्या. या कामगिरीमुळे धोनीला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला.

2019 मध्ये आतापर्यंत सहा डावात धोनीच्या बॅटमधून 301 धावा निघाल्या आहेत. यात तो चार वेळा नाबाद राहिला आहे. त्याने या धावा 150 च्या सरासरीने चोपल्या आहेत, तर त्याचा स्ट्राईक रेट आहे 80.26. यात त्याने चार अर्धशतकं ठोकली आहेत आणि ती देखील ऑस्ट्रेलियासारखा मोठा संघ समोर असताना. शनिवारीही धोनीने आपल्या बॅटचा प्रताप दाखवत हिंदुस्थानला खराब परिस्थितीतून बाहेर काढत विजय मिळवून दिला. हैदराबादमध्ये धोनीने शेवटपर्यंत नाबाद राहात 59 धावा चोपल्या.

धोनीने केदार जाधवसोबत मिळून अभेद्य भागिदारी करत संघाला 6 विकेट्सने विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर सामनावीरचा पुरस्कार मिळालेला जाधव म्हणाला की, ‘दुसऱ्या बाजूला धोनी नसता तर मी खूप आधीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला असता. परंतु तो तुमचे मन ओळखतो आमि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. कुठल्या चेंडूवर चौकार कसा ठोकायचा हे धोनी योग्य प्रकारे सांगू शकतो.’

आपली प्रतिक्रिया द्या